पाकिस्तान, श्रीलंकेतील हाल पाहून पीएम मोदी ॲक्टीव्ह; भारतावर परिणाम होण्याची भीती | पुढारी

पाकिस्तान, श्रीलंकेतील हाल पाहून पीएम मोदी ॲक्टीव्ह; भारतावर परिणाम होण्याची भीती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आर्थिकदृष्ट्या खिळखिळे झालेल्या पाकिस्तान तसेच श्रीलंका या दोन शेजारी देशांतील परिस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून घेतली.

चीनच्या अवाढव्य कर्जामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही देश दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. पाकमध्ये तर अभूतपूर्व राजकीय संकट निर्माण झालेले आहे. दोन्ही देशांतील घडामोडींचा परिणाम भारतावर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन भारताने सध्या मोठी सावधानता बाळगलेली आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांत श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात मदतही देण्यात आलेली आहे.

श्रीलंकेत आर्थिक संकटापाठोपाठ राजकीय संकटदेखील उद्भवलेले आहे. संकटावर मात करण्यासाठी तेथील राजपक्षे सरकारने विरोधी पक्षांतील काही नेत्यांना मंत्रिमंडळात घेतले आहे. दोन्ही देशात सुरु असलेल्या घडामोडींची माहिती जयशंकर यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली. दरम्यान श्रीलंकेतील परिस्थिती अतिशय खराब असल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार सिंग यांनी दिली आहे.

मानवीय गरजा लक्षात घेऊन श्रीलंकेला गेल्या काही दिवसांपासून खाद्यान्न, इंधन दिले जात असल्याचे सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गेल्या एक आठवड्यापासून महागाई आणि अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा यामुळे श्रीलंकेत हाहाकार उडालेला आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button