रशिया- युक्रेन युद्ध : कुटनितीमुळे भारताचा वाढला जगात दबदबा; अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री भारत दौर्‍यावर | पुढारी

रशिया- युक्रेन युद्ध : कुटनितीमुळे भारताचा वाढला जगात दबदबा; अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री भारत दौर्‍यावर

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. याच दरम्यान भारताचे मुत्सद्देगिरीचे धोरण जगात चर्चेत आले आहे. यातच चीन, मेक्सिको, ब्रिटन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचा भारत दौरा महत्वाचा मानला जात आहे. रशिया आणि ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री गुरुवारी रात्री भारतात दाखल होत आहे.

हल्लीच चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत दौरा केला. युक्रेनसह अनेक मुद्यांवर त्यांनी भारतासोबत द्विपक्षीय चर्चा केली. आता मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्शलो एबरार्ड भारत दौऱ्यावर आहेत. मेक्सिको संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे आणि त्याचा जी-२० मध्येही सहभाग आहे. तो भारताप्रमाणेच स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा पुरस्कर्ता आहे. याच दरम्यान जर्मनीचे राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाचे सल्लागार भारत दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारदेखील भारत दौऱ्यावर येणार आहेत.

रशियाचे परराष्ट्र मंत्री आज भारत दौऱ्यावर

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह हे दोन दिवसीय भारत दौर्‍यावर येत आहेत. ३१ मार्च ते १ एप्रिल असा त्यांचा हा दौरा असेल. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियावर कडक निर्बंध लादलेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा भारत दौरा व्यापार द़ृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. सर्गेई लाव्हरोव्ह सध्या चीन दौऱ्यावर आहेत. युक्रेनवरील हल्ल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तटस्थ भूमिका घेतली होती. आता यानंतर रशियाला भारतासोबत व्यापार वाढवायचा आहे. भारताने तेल, गॅसची खरेदी करावी, यासाठी रशियाकडून प्रयत्न सुरु आहेत. युद्धामुळे निर्बंध लादल्याने रशियातून युरोपमध्ये होणारा विविध वस्तूंचा पुरवठा कमी होत आहे. त्याशिवाय रशियाकडून भारताच्या शस्त्रास्त्र खरेदीतही घट झाली असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याबाबत भारताची स्वतःची चिंता आहे. कारण S-400 क्षेपणास्त्र प्रणालीचा पुरवठा होण्यात विलंब होत आहे. रशियाने सर्व पाच युनिट्सचा पुरवठा लवकरात लवकर सुनिश्चित करावा, अशी भारताची इच्छा आहे. याशिवाय स्विफ्टवर बंदी घातल्यानंतर भारत आणि रशिया पर्यायी पेमेंट सिस्टमवरही चर्चा करू शकतात.

रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची जयशंकर यांच्याशी चर्चा होणार

रशियाचे परराष्ट्र मंत्री भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भेट घेणार आहेत. मात्र त्यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट होईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दुलीप सिंह आणि ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लिज ट्रस हे भारत दौऱ्यावर येत असतानाच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांचा भारत दौरा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका, ब्रिटन आणि अन्य युरोपीय देश अप्रत्यक्षपणे प्रयत्न करत आहेत. भारताच्या तटस्थ भूमिकेबद्दल त्यांना फारशी चिंता नाही, पण सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीत रशियाला व्यावसायिक फायदा मिळत असल्याने हे देश खूश नाहीत.

मागील आठवड्यात चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी भारत दौरा केला होता. याशिवाय हिंद प्रशांतसाठी युरोपियन संघाचे विशेष दूत गॅब्रिएल व्हिसेंटिन या आठवड्यात नवी दिल्लीत आले. या दौऱ्यांबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय राजकारण ज्या पद्धतीने बदलत आहे, ते पाहता भारतासोबतच्या आपल्या द्विपक्षीय हितसंबंधांवर परिणाम होऊ नये, असे प्रत्येक शक्तिशाली देशाला वाटते. त्यामुळे युक्रेनबाबत भारताची तटस्थ भूमिका असूनही सर्व देशांनी भारतासोबतचे संबंध कायम ठेवले आहेत.

रशियाबाबत भारताची तटस्थ भूमिका

भारताचे रशियासोबत जुने मैत्रीसंबंध आहेत. यामुळे रशियाबाबत भारताची नेहमीच तटस्थ भूमिका राहिली आहे. युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबद्दल भारताने रशियावर टीका केलेली नाही. रशियन आक्रमणाचा निषेध करणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांवर मतदान करण्यापासून भारताने अलिप्त भूमिका घेतली होती. युक्रेनमधील मानवतावादी संकटावर रशियाने मांडलेल्या ठरावावरील मतदानावेळीही भारताने गेल्या गुरुवारी अनुपस्थित दर्शवली होती. यावरुन दोन्ही देशांतील संघर्षावर भारताची न्याय्य भूमिका स्पष्ट होते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : पाणस्थळी हमखास दिसणाऱ्या भोरड्यांच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? | Rosy starling

Back to top button