आसाम-मेघालय या दोन राज्यांमधील ५० वर्षांचा सीमावाद संपला ! | पुढारी

आसाम-मेघालय या दोन राज्यांमधील ५० वर्षांचा सीमावाद संपला !

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ईशान्य भारतातील आसाम आणि मेघालय या दोन राज्यांमधील 50 वर्षांपासूनचा सीमावाद आता संपला आहे. मंगळवारी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत करार केला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी गृह मंत्रालयात करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच या बैठकीला दोन्ही राज्यांचे मुख्य सचिवही उपस्थित होते.

अमित शाह कराराची माहिती देताना म्हणाले की, मला आनंद होत आहे की आज आसाम आणि मेघालयमध्ये 12 पैकी 6 विवादांवर करार झाला आहे. सीमेच्या लांबीच्या दृष्टिकोनातून आज जवळपास 70 टक्के सीमावाद संपला आहे. आणि मला खात्री आहे की बाकी 6 क्षेत्रांतील गोष्‍टीही आम्ही लवकरच सोडवू, असे ते म्‍हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, वादमुक्त ईशान्येसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, मोदीजी जेव्हापासून देशात पंतप्रधान झाले, तेव्हापासून शांतता प्रक्रिया, विकास, समृद्धी आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

12 क्षेत्रांशी संबंधित विवाद

मेघालय 1972 मध्ये आसाममधून वेगळे करण्यात आले. आसाम पुनर्रचना कायदा, 1971 ला आव्हान दिले, ज्यामुळे सामायिक 884.9 किमी लांबीच्या सीमेच्या विविध भागांमधील 12 क्षेत्रांशी संबंधित वाद निर्माण झाला. दोन्ही राज्यांमध्ये अनेकदा सीमावाद उफाळूनही आला होता. 2010 मध्ये अशाच एका घटनेत  पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता.

करारामुळे शांतता पुनर्स्थापित होईल

मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा म्हणाले की, हा सीमावाद सोडवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या बाजूने खूप जोर देण्यात आला आहे. भारत-बांगलादेश वाद सोडवला आहे तर देशातील दोन राज्यांतील वाद का नाही सोडवला जाणार, असे ते म्‍हणाले.  तसेच आम्ही गृहमंत्री अमित शहा आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत. आता सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित होईल. असे कोनराड संगमा म्‍हणाले.

हेही वाचा  

Back to top button