नवी दिल्ली : भारतात रोज 48 अब्ज लिटर पाणी जाते वाया | पुढारी

नवी दिल्ली : भारतात रोज 48 अब्ज लिटर पाणी जाते वाया

नवी दिल्ली : नुकताच जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतातील अनेक भागांत आतापासूनच गंभीर पाणी टंचाई जाणवू लागली आहे. राजधानी दिल्लीत तर पाण्याची भीषण टंचाई जाणवते. याशिवाय अशी अनेक उदाहरणे आहेत की, टंचाईदरम्यान अनेक शहरांना रेल्वेने पाणी पुरवले जाते. असे असले तर देशात रोज अब्जावधी लिटर पाणी वाया जाते.

पाण्याचा जपून वापर करावा, हे प्रत्येकाचे आद्यकर्त्यव्य आहे. मात्र, यावर अंमल होताना दिसत नाही. कारण भारतात रोज तब्बल 48 अब्ज लिटर पाणी वाया जाते. नळ सुरू करून ब्रश करणे, दाढी करणे, स्नान करताना नळ तसाच सुरू ठेवणे याशिवाय पाणी भरतानाही पाणी वाया घालवले जाते. अशा अनेक कारणांमुळे देशात रोज 48 अब्ज लिटर पाणी वाया घालवले जाते.

एका अहवालानुसार एक भारतीय नागरिक रोज 45 लिटर पाणी कळत न कळत वाया घालवतो. आम्ही रोज एकूण पुरवठ्यापैकी 30 टक्के पाणी वापरतो आणि बाथरूम व टॉयलेटसाठी 27 टक्के पाणी खर्च करतो. तसेच दाढी, ब्रश करताना नळ सुरू ठेऊन पाणी वाया घालवले जाते. तर वॉशिंग मशिन आणि लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते.

अकारण नळ सुरू ठेवल्याने स्वच्छ पाणी वाहून जाण्याचे प्रमाणाही जास्त असते. अशा अनेक कारणांमुळे एक दिवसात 4 कोटी 84 लाख क्यूबिक मीटर म्हणजे 48.42 अब्ज लिटर पाणी वाया जाते. हा आकडा खरोखरच भयावह आहे. मात्र, जल हेच जीवन हे तत्त्व नजरेसमोर ठेऊन पाणी जर वाचवले देशातील टंचाई दूर होईल.

Back to top button