नगर : भीषण अपघातात दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू, दोघांच्या वडिलांचे सुद्धा नुकतेच निधन | पुढारी

नगर : भीषण अपघातात दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू, दोघांच्या वडिलांचे सुद्धा नुकतेच निधन

नगर : पुढारी वृत्तसेवा : दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात दोन सख्खे चुलत भाऊ जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. उद्धव सुभाष तेलोरे आणि बाळकृष्ण श्रीकांत तेलोरे (रा. कोल्हूबाईचे कोल्हार, ता. नगर) अशी अपघातात ठार झालेल्या चुलत भावांची नांवे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, उद्धव आणि बाळकृष्ण दुचाकीवरून (एमएच १६ बी ई ४९५५) मनमाड रस्त्यावरून तारकपूर रस्त्याकडे जात होते. ट्रकही त्याच रस्त्याने जात होता. परंतु, तेलोरे बंधूंनी त्यांची दुचाकी पत्रकार चौकातील एल अ‍ॅण्ड टी कंपनीने विकसित केलेल्या बागेतून भरधाव नेली. बागेतून रस्त्यावर येत असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणार्‍या ट्रकची (एमएच १६ सीसी ५७५९) जोराची धडक बसली. त्यामुळे तेलोरे बंधूंचा वाहनावरील ताबा सुटून ते रस्त्यावर खाली पडले. या दरम्यान, ट्रक चालकाला वाहनावर नियंत्रण मिळवेपर्यंत दोघेही ट्रकखाली चिरडले गेले. अपघात घडताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. परंतु, दोघेही जागेवरच गतप्राण झाले होते.

सुदैवाने तो वाचला

अपघाताच्या १० मिनिट आधी तेलोरे बंधू तारकपूर रस्त्याने मनमाड रस्त्याकडे गेले होते. त्यावेळी ते दुचाकीवर ट्रिपल सीट होते. त्यांच्यातील तिसरा मनमाड रस्त्यावर उतरला आणि त्याला सोडून तेलोरे बंधू माघारी पुन्हा तारकपूर रस्त्याकडे येत होते. त्यामुळे तो दुचाकीवरून उतरल्याने सुदैवाने तो वाचला.

दोघांच्याही वडिलांचे नुकतेच निधन

तेलोरे बंधूंचे वडील सख्खे भाऊ होते. दोघेही एसटीमध्ये नोकरीस होते. त्यातील चालक असलेल्या सुभाष तेलोरे यांनी एसटी कामगार संपादरम्यान फाशी घेऊन आत्महत्या केली. तर एसटीच्या सर्जेपुर्‍यातील कार्यालयातील रोखपाल श्रीकांत तेलोरे यांचे कोल्हारच्या घाटात अपघाती निधन झाले होते. ही घटना ताजी असतानाच काळाने त्यांच्या मुलांवर घाला घातला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button