नाशिक : दुरावलेला बछडा पुन्हा आईच्या कुशीत; वनविभागाने घडविली पुनर्भेट | पुढारी

नाशिक : दुरावलेला बछडा पुन्हा आईच्या कुशीत; वनविभागाने घडविली पुनर्भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या सर्वत्र ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. मात्र, उसाचे शेत वास्तव्याचे ठिकाण झालेल्या बिबट्यांवर विस्थापित होण्याची वेळ येते. त्यातूनच माता आणि बछड्यांची ताटातूट होण्याचे प्रसंग घडतात. अशाच एका दुरावलेल्या बछड्याची आणि आईची पुनर्भेट घडवून आणण्यात वनविभाग व इको-एको फाउंडेशनला यश आले आहे. अवघ्या 15 दिवसांचा बछडा आईच्या कुशीत सुखरूप परतल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.

दिंडोरी प्रादेशिक वनपरिक्षेत्रात उमराळे परिमंडळात मोहाडी येथील अण्णासाहेब जाधव यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना, सकाळी आठच्या सुमारा बिबट्याचे 15 दिवसांचे पिलू कामगारांना आढळून आले. स्थानिक शेतकर्‍यांनी तत्काळ घटनेची माहिती वनविभागाला कळविली. वनकर्मचार्‍यांसह इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेत, बछडा ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. बछडा सुद़ृढ असल्याची खात्री पटल्यानंतर पुनर्भेटीची प्रक्रिया सुरू झाली. ज्या ठिकाणी बछडा आढळला होता. त्या परिसराची पाहणी करून बछड्याला त्याच उसाच्या शेतात सायंकाळी ठेवण्यात आले. लाइव्ह कॅमेरा लावून मादी बिबट्या व बछड्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यात आली. परिसरात कोणी नसल्याचा तसेच सुरक्षित वातावरण असल्याचा अंदाज घेत मादीने बछड्याला आपल्या तोंडात धरत प्रस्थान केले. हा सर्व प्रकार कॅमेर्‍यात कैद झाला आहे. अवघ्या 15 दिवसांचा बछडा सुखरूप आईच्या कुशीत विसावल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

दरम्यान, नाशिक पूर्व भागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे, सहायक वनसंरक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी, वनपाल अशोक काळे, वनरक्षक योगिता खिरकाडे, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले व इको-एको फ़ाउंडेशनचे सागर पाटील, आदित्य सामेळ आदींनी स्थानिकांच्या मदतीने बिबट्या मादी व बछड्यांची पुनर्भेट यशस्वीरीत्या घडवून आणली.

हेही वाचा :

Back to top button