युपी निवडणूक : सपा, राष्ट्रवादी, राजदच्या आघाडीपासून शिवसेना लांबच! | पुढारी

युपी निवडणूक : सपा, राष्ट्रवादी, राजदच्या आघाडीपासून शिवसेना लांबच!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी आणि राजदची आघाडी झाली आहे. पंरतु, शिवसेनेने या आघाडीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युपी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.

सपा, राष्ट्रवादी आणि राजदच्या आघाडीला पाठिंबा का द्यावा? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. सपा, राष्ट्रवादी राजदची आघाडी होत असली तरी उत्तर प्रदेश बाबत आमची काही भूमिका नाही. या आघाडीला का पाठिंबा द्यावा? शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुका लढवेल.

त्यांची आघाडी त्यांच्या पाशी. त्यांच्या आघाडीला शुभेच्छा आहेत. त्यांनी विजय प्राप्त करावा, याही शुभेच्छा आहेत. उत्तर प्रदेशात आमच्या ताकदीनुसार निवडणूक लढवतोय. सपाशी अजिबात युती होणार नाही, असे राऊत यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले.

अधिक वाचा :

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल बोलतांना ते म्हणाले की, सर्वांनी एकत्र यावे, अशी ममतादीदींची इच्छा आहे. त्यांचे विधान ऐकले. आधी एकत्र येऊ. काम करू. नेता आणि चेहरा नंतर ठरवू, असे त्या म्हणाल्या.

त्यांच्या कामात त्यांना यश मिळो ही आमची सदिच्छा आहे, असे सांगतानाच नेता आणि चेहरा ठरवणे कठिण आहे हा तुमचा गैरसमज आहे. योग्य वेळ येताच एकमत होते. गरजेतून आणि संकटातून असे चेहरे आणि नेतृत्व निर्माण होत असते, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री दिल्लीत येतात तेव्हा सर्वांनाच भेटतात

दरम्यान ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

ममता बॅनर्जी यांचे शरद पवारांशी जिव्हाळ्याशी संबंध आहेत. उद्धव ठाकरेंशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नुसती भेट घेतली की भेट झाली यावर नाती टिकत नसतात. त्यांचे संबंध सर्वांशी चांगले आहेत, असं त्यांनी सांगितले.

भेटीगाठी होत राहतात. अजून दोन दिवस आहेत त्या दिल्लीत. राज्याच्या मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीत येतात. तेव्हा आपल्या राज्यातील अनेक विकास कामांची जंत्री घेऊन येतात. गडकरींकडे महामार्ग रस्ते, पायाभूत सुविधा हे खाते आहे. बंगालमधील अशा कामासाठी त्या गडकरींना भेटत असतील तर मीडिया आणि राजकारण्यांना भुवया उंचावण्याचे काही कारण नाही, असे ते म्हणाले.

ममतादीदी उद्धव ठाकरेंना भेटणार का मला माहीत नाही. परंतु, जेव्हा ममतादीदी मुंबईत येतात तेव्हा त्या उद्धव ठाकरेंना भेटतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा :

सरकारला सत्याची भिती वाटते

सरकारला संसद चालू द्यायची नाही. सरकार विरोधी पक्षावर ठपका ठेवत आहे. परंतु, सरकारलाच गोंधळ निर्माण करायचा आहे. सरकारला पेगाससवर सत्य ऐकण्याची भिती वाटते.

विरोधी पक्षाकडून त्यांना जे ऐकावे लागेल त्याबाबत त्यांच्या मनात धास्ती आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सत्य ऐकण्याची तयारी ठेवली पाहिजे. पेगासस असेल, कृषी कायदे असेल… विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज असतो.

त्याचे ऐकणे लोकशाहीत प्रत्येक सरकारला बंधनकारक जरी असले तरी केंद्रातले सरकार त्या संदर्भात सतत माघार घेताना दिसते. सरकार या गोंधळास प्रवृत्त करतेय. हा गोंधळ असाच राहावा आणि संसद ठप्प राहावी ही सरकारची इच्छा दिसते.

त्याचे कुणी समर्थन करू नये, असे सांगतानाच अनेक प्रकारची विधेयके कोणतीही चर्चा न करता पास केली जात आहेत. सरकारला हेच हवे आहे. त्यामुळे सरकार पेगाससवर चर्चा करत नाही, असा आरोप त्यांनी केला.

Back to top button