पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकतांत्रिक जनता दल हा पक्ष लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात (आरजेडी) विलीन करण्यात आला आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा माजी केंद्रीय मंत्री व पक्षाचे सर्वेसर्वा शरद यादव यांनी आज (दि. २०) केली. जनता परिवार मजबूत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रकृती अस्वस्थ्यामुळे शरद यादव यांनी पक्ष विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
देशात प्रबळ विरोधी पक्षाची स्थापना करणे ही काळाची गरज आहे. केवळ विखुरलेल्या जनता दलालाच नव्हे, तर इतर समविचारी पक्षांनाही एकत्र आणण्यासाठी मी या दिशेने दीर्घकाळ काम करत आहे. म्हणूनच माझा पक्ष 'एलजेडी' हा 'आरजेडी'मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे शरद यादव यांनी आपल्या ट्विट म्हटले आहे.
यादव यांनी म्हटले आहे की, जनता पक्षाचे विलीनीकरण हे लालू प्रसाद यादव यांच्या जनता परिवाराला एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचे फळ आहे. आज देशाची राजकीय परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्याची गरज होती. १९८९ मध्ये जनता दलाचे १४३ खासदार होते. दरम्यान, या पक्षाला सामाजिक न्यायाच्या अजेंड्याचा विसर पडला. त्यामुळे आज या पक्षाला पुनरूजीवित करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर शरद यादव यांनी २०१८ मध्ये संयुक्त जनता दल (जेडीयू ) पक्षातून बाहेर पडत लोकतांत्रिक जनता दलाची स्थापना केली हाेती. यावेळी त्यांना अली अनवर आदीसह अन्य इतर नेत्यांनी साथ दिली होती. त्यानंतर २०१९ मध्ये यादव यांनी आरजेडीच्या तिकीटावर मधेपुरातून निवडणूकही लढवली होती; परंतु जेडीयूच्या उमेदवाराने त्यांचा सुमारे १ लाख मतांनी पराभव केला होता.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie