मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्या कंपन्यांना तेल कंपन्यांचा दणका; लीटरमागे 25 रुपये वाढीव दराने विक्री | पुढारी

मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्या कंपन्यांना तेल कंपन्यांचा दणका; लीटरमागे 25 रुपये वाढीव दराने विक्री

पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली : मोठ्या प्रमाणात अर्थात बल्क डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तेल कंपन्यांनी दणका दिला असून, लीटरमागे 25 रुपये वाढीव दराने अशा कंपन्यांना डिझेलची विक्री केली जात आहे. किरकोळ ग्राहकांसाठीचे पेट्रोल पंपावरील दर मात्र जैसे थे आहेत. जागतिक बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत इंधन दर कडाडले आहेत. त्यामुळे बल्क ग्राहकांसाठीच्या डिझेल विक्री दरात वाढ करण्यात आली आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये बल्क खरेदीदारांना आतापर्यंत 86.67 रुपये प्रती लीटर या दराने डिझेलची विक्री केली जात होती, मात्र हे 25 रुपयांनी वाढवून 115 रुपयांपर्यंत नेण्यात आले आहेत. मुंबईत हेच दर 122 रुपयांवर गेले आहेत. पेट्रोल पंपावर सध्या 94.14 रुपये प्रती लिटर दराने विक्री होत आहे. बल्क अर्थात मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये प्रामुख्याने संरक्षण खाते, रेल्वे आणि वाहतूक महामंडळे, ऊर्जा प्रकल्प, सिमेंट कारखाने, रासायनिक प्रकल्प आदींचा समावेश आहे. बल्क खरेदीदारांना तेल कंपन्यांना वेगळ्या पध्दतीने इंधन पुरवठा करीत असते. अशा ग्राहकांसाठीची इंधन स्टोअरेज व हॅन्डलिंगची व्यवस्थादेखील वेगळी असते.

रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यानच्या युध्दामुळे गेल्या काही दिवसात इंधन दर मोठ्या प्रमाणात कडाडले आहेत. जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे प्रती बॅरलचे भाव 108 डॉलर्सवर गेले आहेत. मात्र असे असले तरी तेल कंपन्यांनी मागील नोव्हेंबर महिन्यापासून किरकोळ ग्राहकांसाठीच्या इंधन दरात वाढ केलेली नाही. दरम्यान चढ्या इंधन दरामुळे नायरा एनर्जी, जिओ-बीपी, शेल यासारख्या खाजगी इंधन विक्री कंपन्यांचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इंधन विकण्यापेक्षा पेट्रोल पंप बंद ठेवणे अशा कंपन्यांसाठी जास्त संयुक्तिक बनले आहे. त्यामुळे लवकरच खाजगी तेल विक्री कंपन्यांकडून आगामी काळात पंप बंद केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button