नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा
येत्या १२ एप्रिलला होवू घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha polls) भाजपने चार राज्यांतील उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार आसाममधून पबित्रा मार्गरीटा, हिमाचल प्रदेशमधून डॉ. सिकंदर कुमार, नागालँडमधून एस. फेंगनोन कोन्यक तसेच त्रिपुरातून डॉ. मणिक साहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
यासोबतच पक्षाने पश्चिम बंगालमधील लोकसभा, विधानसभा तसेच बिहार आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अग्निमित्र पॉल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, बालिगंज विधासभा पोटनिवडणूक केया घोष भाजपकडून लढवणार आहेत. बिहारच्या बोचहां या अनुसूचित जाती करिता आरक्षित विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने बेबी कुमारी तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत सत्यजीत शिवाजीराव कदम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
बोचहा विधानसभेची जागा विकासशील इंसान पार्टीचे आमदार मुसाफिर पासवान यांच्या निधनाने नोव्हेंबर महिन्यापासून रिक्त आहे. तर, काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची जागा रिक्त आहे. १७ मार्च रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. २४ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची, तर २८ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १६ एप्रिलला मतमोजणी होईल.
हे ही वाचा :