India’s GDP : जीडीपी दर ९.१ टक्के इतका राहण्याचा ‘मुडीज’चा अंदाज | पुढारी

India’s GDP : जीडीपी दर ९.१ टक्के इतका राहण्याचा 'मुडीज'चा अंदाज

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

युक्रेन आणि रशिया यांच्यादरम्यान सुरु असलेल्या युध्दाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता जागतिक स्तरावरील पतमापन संस्था ‘मुडीज’ ने देखील व्यक्त केली असून युध्दाच्या परिणामी चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर 9.1 टक्के इतका होऊ शकतो, असे म्हटले आहे. याआधी मुडीजने 9.5 टक्के जीडीपी दराचा अंदाज वर्तवला होता. ( India’s GDP )

India’s GDP : मुडीजने गतवर्षी साडेनऊ टक्के दराचा अंदाज व्यक्त केला होता

कोरोना संकटातून देशाची अर्थव्यवस्था सावरल्याच्या पार्श्वभूमीवर मुडीजने गतवर्षी साडेनऊ टक्के दराचा अंदाज व्यक्त केला होता, हा अंदाज वर्तविण्यापूर्वी सात टक्के दराचे भाकीत वर्तविण्यात आले होते. पण आता युध्दाची झळ भारताला बसू शकते, असे सांगत मुडीजने जीडीपी दराच्या अंदाजात कपात केली आहे. धान्य आणि कृषी उत्पादनाच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण आहे. त्यामुळे या क्षेत्रातील वस्तूंच्या वाढीव दराचा फटका बसणार नाही, पण देशाला लागणारे 80 टक्के इंधन विदेशातून आयात करावे लागते. अशा स्थितीत जागतिक बाजारातील इंधनाच्या चढ्या दराचा फटका अर्थव्यवस्थेला बसू शकतो, असे मुडीजचे म्हणणे आहे.

इंधनासह खतांच्‍या चढ्या दराचा मुकाबलासुद्धा करावा लागू शकतो

केवळ इंधनच नव्हे तर खतांच्या चढ्या दराचा मुकाबलासुद्धा भारताला करावा लागू शकतो, असे सांगत मुडीज पुढे म्हणते की, चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर 9.1 टक्के इतका राहू शकतो तर त्यापुढील वर्षात हा दर 5.4 टक्के इतका राहू शकतो. युद्धाचा फटका केवळ भारताला बसत आहे असे नाही तर जगातील बहुतांश देशाला त्याची झळ पोहोचत आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या साखळीवर याचा परिणाम झाला आहेच पण उत्पादन खर्च वाढल्यामुळे आगामी काळात महागाईचा भडका देखील उडू शकतो. अर्थ आणि वित्त क्षेत्रात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

हेही वाचलं का ?

 

 

Back to top button