न्यूयॉर्क; पुढारी ऑनलाईन
रशियाचे युक्रेनवर आक्रमण सुरुच आहे. दोन्ही देशांतील संघर्षाचा जगातील अन्न सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला असल्याची चिंता जागतिक अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) व्यक्त केलीय. रशिया-युक्रेन संघर्षामुळे या देशांतून अन्नधान्य आणि खाद्यतेलाची निर्यात ठप्प झाली आहे. यामुळे जगातील अन्नधान्यांच्या किमतीवर मोठा परिणाम झालाय. परिस्थिती अशीच राहिल्यास गव्हाच्या किमतीत ८.७ टक्क्यांनी वाढ होईल. तर संघर्ष आणखीन चिघळल्यास गव्हाचे दर २१.५ टक्क्यांनी वाढू शकतात, असा अंदाज एफएओचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मॅक्सिमो टोरेरो यांनी व्यक्त केला आहे. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात बोलताना त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.
युक्रेनमधील संघर्षापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्नधान्याच्या किमती वाढल्या होत्या. संघर्षानंतर अन्नधान्यांच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे मक्याच्या दरात १९.५ टक्क्यांनी तर भरडधान्यांच्या दरात ७ ते १९.९ टक्क्यांनी वाढ होईल. तेलबियांच्या किमती १०.५ ते १७.९ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात, असेही टोरेरो यांनी म्हटले आहे. अन्न सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊन कुपोषित लोकांच्या संख्येत १ कोटी ३ लाखांपर्यंत वाढ होण्याची भिती आहे.
FAO फूड प्राइस इंडेक्स फेब्रुवारीमध्ये सरासरी १४०.७ अंकांवर होता. जानेवारीच्या तुलनेत ३.९ टक्क्यांनी आणि एका वर्षाच्या आधीच्या पातळीपेक्षा तो २०.७ टक्क्यांनी अधिक आहे.
रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गहू, मका, सूर्यफूल आणि सूर्यफूल तेलाचे मोठे निर्यातदार आहेत. रशिया- युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातून होणारी धान्य पुरवठ्याची वाहतूक थांबली आहे. रशिया आणि युक्रेनमधून जगातील एकूण निर्यातीपैकी ३० टक्के गहू निर्यात होतो. पण युद्धामुळे या देशांतून होणारी गव्हाची निर्यात थांबली आहे.
युक्रेनमधील काळ्या समुद्राचा प्रदेश (Black Sea region) हा सुपीक आहे. हा भाग जगाचा ब्रेडबास्केट (Breadbasket of the World) म्हणून ओळखला जातो. कारण रशिया आणि युक्रेन हे गहू (wheat) आणि बार्लीचे (barley) मोठे निर्यातदार देश आहेत. जगातील गहू आणि बार्लीच्या निर्यातीपैकी जवळजवळ एक तृतीयांश निर्यात या दोन देशांतून होते. युक्रेन मक्याचादेखील एक प्रमुख पुरवठादार देश आहे आणि सूर्यफूल तेल निर्यातीत तो जगात आघाडीवर आहे. पण रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमधील शेतकऱ्यांनी (Ukrainian farmers) देश सोडून शेजारील देशांत आश्रय घेतला आहे. बंदरे ओस पडल्याने येथून जगभरात गहू आणि इतर खाद्यपदार्थांची होणारी निर्यात थांबली आहे. त्याचबरोबर कृषीसंपन्न असलेल्या रशियावर पाश्चात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे जगभरात धान्य निर्यात कमी होऊ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.