हरिद्वार; पुढारी ऑनलाईन
उत्तराखंडमध्येही भाजपने (Uttarakhand Assembly Results 2022) सलग दुसर्यांदा सत्ता राखली. विशेष म्हणजे, भाजपने या छोट्या राज्यात एकदा नव्हे, दोनदा मुख्यमंत्री बदलला. या पक्षांतर्गत राजकारणाचा जराही फटका बसू न देता भाजपचे तिसरे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी भाजपची सत्ता पुन्हा खेचून आणली. अशातच हरिद्वार जिल्ह्यातील खानपूर विधानसभा जागेवर निवडणूक जिंकलेले अपक्ष उमेदवार उमेश कुमार (Umesh Kumar) चर्चेत आले आहेत. पत्रकार ते आमदार असा प्रवास करणाऱ्या उमेश कुमार यांनी धक्कादायक विजय नोंदवला आहे. त्यांनी आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांचा बालेकिल्ला राहिलेल्या मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे. नेहमी वादात अडकलेल्या प्रणव सिंह यांचे तिकीट कापण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पत्नी राणी देवयानी भाजपच्या तिकीटावर मैदानात उतरल्या होत्या. पण उमेश कुमार यांनी बसपाचे रवींद्र सिंह यांचा ६,९०० मतांनी पराभव केला. तर भाजपच्या राणी देवयानी तिसऱ्या स्थानी राहिल्या.
पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवलेले उमेश कुमार जिंकले आहेत. उमेश कुमार २०१६ मध्ये सर्वाधिक चर्चेत आले होते. कारण त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत यांचे स्टिंग ऑपरेशन करत आमदारांच्या घोडेबाजाराचा पर्दाफाश केला होता. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. उमेश कुमार एका न्यूज चॅनेलचे मालक आहेत. खानपूरमधील विकासासाठी मला जनतेने निवडून दिल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना गर्विष्ठ राजा नको असतो तर सेवक हवा असतो, असेही त्यांचे म्हणणे आहे.
खानपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेश कुमार यांची पार्श्वभूमी राजकीय नाही. त्यांना निवडणूक लढविण्याचा अनुभवदेखील नव्हता. तरीही उमेश कुमार काही दिवसांतच लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे उमेश कुमार हेलिकॉप्टरवाला नेता म्हणून चर्चेत होते. उमेश कुमार हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील शेकडो लोकांना हेलिकॉप्टर प्रवासाचा आनंद मिळवून दिला आहे. हेलिकॉप्टरवाला नेता नावाने चर्चेत असणाऱ्या या नेत्याने निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर हेच चिन्ह निवडले होते.
हे ही वाचा :