election 2022 : भाजपची ‘चौफेर’ घोडदौड, यूपी, उत्तराखंड, गोवा, मणिपूरवर झेंडा; आप ‘पंजाब दा पुत्तर’; काँग्रेसचे पानिपत | पुढारी

election 2022 : भाजपची 'चौफेर' घोडदौड, यूपी, उत्तराखंड, गोवा, मणिपूरवर झेंडा; आप ‘पंजाब दा पुत्तर’; काँग्रेसचे पानिपत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था/पुढारी वृत्तसेवा : चौफेर घोडदौड करीत भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभांवर आपला झेंडा फडकावला आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांची ऐतिहासिक मॅच सलग तिसर्‍यांदा जिंकण्याच्या दिशेने खणखणीत ‘चौकार’ मारला. (election 2022 )

दिल्लीत सत्तेवर असलेला आम आदमी पक्ष मात्र ‘पंजाब दा पुत्तर’ ठरला आहे. या पाचही राज्यांत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुन्हा एकदा भाजपच्या एकपक्षीय राजवटीच्या दिशेने निघाल्याचा कौल मिळाला.

भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतिहास घडवला. लोकसभेवर सर्वाधिक 80 खासदार पाठवणार्‍या या राज्याने गेल्या 37 वर्षांत कोणत्याही पक्षाच्या हाती सलग दुसर्‍यांदा सत्ता कधी दिली नव्हती. ती योगी यांच्या हाती दिली. 2017 साली भगवी वस्त्रे परिधान करणारे योगी मुख्यमंत्रिपदी बसले आणि आता पुढची पाच वर्षे योगींचीच सत्ता उत्तर प्रदेशवर असेल. योगींचा आणखी एक विक्रम म्हणजे 1985 नंतर कोणताही मुख्यमंत्री पुन्हा निवडून आला नव्हता. योगी मात्र सत्ता राखतानाच दणदणीत मतांनी जिंकलेदेखील!

election 2022 : राष्ट्रवादी-शिवसेना, तृणमूल निष्प्रभ

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला शह दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मोठा गाजावाजा करीत गोवा विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. मात्र, त्यांना भोपळाही फोडता आला नाही. राष्ट्रवादीशी युती करून मैदानात उतरलेल्या शिवसेनेच्या वाघाचा तर मुखभंग झाला.

election 2022 : बसपचा हत्ती आडवा झाला

भाजपचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशात केला तो फक्त समाजवादी पक्षाने. अखिलेश यादव यांनी सपची जेमतेम 47 वर असलेली आमदार संख्या मित्रपक्षांना सोबत घेत सव्वाशेच्या पार पोहोचवली खरी. मात्र, अखिलेश यांची ही मोठी खेळी भाजपचा विजयरथ रोखू शकली नाही. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा फक्त एक आमदार निवडून आला. 2012, 2014, 2017, 2019 आणि आता 2022 अशा सलग पाच निवडणुकांत भुईसपाट होण्याचा विक्रम मायावतींच्या बसपने नोंदवलेला दिसतो! सर्व जातीय समीकरणे फोल ठरवत उत्तर प्रदेशवर चारवेळा राज्य करणार्‍या बसपचा हत्ती भाजपने अक्षरश: आडवा केला.

गांधी भावंडांचा पराभव

एकीकडे सप आणि बसपचे आव्हान संपुष्टात आणतानाच, या निवडणुकीत दारुण पराभव झाला तो गांधी भावंडांचा. मागच्या विधानसभेला राहुल गांधी यांचे लाँचिंग फसले. यावेळी निवडणुकीची सारी सूत्रे प्रियांका गांधी यांच्या हाती होती. उत्तर प्रदेशात मुक्काम ठोकून प्रियांका गांधी यांनी केलेला प्रचार शरयूच्या पाण्यात अक्षरश: वाहून गेला. काँग्रेसचे जेमतेम 2 आमदार निवडून येऊ शकले. काँग्रेसचे ‘गांधी नेतृत्व’ असे सतत पराभूत होत असताना काँग्रेसकडे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाचा कोणताही अन्य पर्याय नाही, हेच या निकालांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

उत्तराखंडात चमत्कार!

उत्तराखंडमध्येही भाजपने सलग दुसर्‍यांदा सत्ता राखली. विशेष म्हणजे, भाजपने या छोट्या राज्यात एकदा नव्हे, दोनदा मुख्यमंत्री बदलला. या पक्षांतर्गत राजकारणाचा जराही फटका बसू न देता भाजपचे तिसरे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी भाजपची सत्ता पुन्हा खेचून आणली. या राज्यावर दोनवेळा राज्य करणार्‍या काँग्रेसचे आव्हानच भाजपने संपुष्टात आणले. मणिपूरसारख्या राज्यात काठावरचे का होईना बहुमत मिळवत भाजपची सत्ता येणे हा देखील राजकीय चमत्कार मानावा लागतो. भाजपने तो करून दाखवला.

गोव्याची सत्ता राखली

दिल्लीहून गोव्यावर स्वारी करण्यास निघालेला अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष यांनी गोव्याची निवडणूक तशी रंगतदार केली आणि दोन जागा जिंकल्या. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष महाराष्ट्रातून युती करून गोव्याच्या मैदानात उतरले. या सर्वांना धोबीपछाड देत इथेही भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता राखली.

भाजपचे गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीशी दोन हात करताना गोमंतकात आघाडीच्या पक्षांना लोळवले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अवघ्या 500 मतांनी जिंकले. मात्र, सावंत यांच्या साखळी मतदारसंघात सभा घेणार्‍या शिवसेनेच्या उमेदवाराला 100 देखील मते मिळवता आली नाहीत. शिवसेनेचे उमेदवार सागर धारगळकर यांना फक्त 99 मते पडली, असे सांगत भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सेना-राष्ट्रवादीची टर उडवली.

पंजाबात ‘आप’ची जोरदार मुसंडी

भाजपने चार किल्ले राखले आणि काँग्रेसला मात्र पंजाबसारखा किल्ला टिकवता आला नाही. पंजाबात मतदारांनी प्रचंड लाथाळ्या खेळणार्‍या काँग्रेसला धडा शिकवला. अकाली दलाला झटका दिला. देशभर चौखूर उधळणारा भाजपचा अश्वरथ रोखला व दिल्लीश्वर असलेल्या आम आदमीच्या हाती प्रथमच मजबुतीने सत्ता दिली.

नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासारखा वाचाळ ‘मानवी बॉम्ब’ बाळगणे आणि केवळ सिद्धू यांच्या हट्टापायी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवणे काँग्रेसला महागात पडले. जुना जाणता अकाली दलसारखा पक्षही पंजाबी मतदारांना पर्याय वाटला नाही. काँग्रेस, भाजप, अकाली दल आदी पक्षांना नाकारून पंजाबच्या जनतेने सत्तेची ‘वरमाला’ आम आदमीच्या गळ्यात घातली.

पाच राज्यांतील निकालाचा अर्थ

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या या निकालांनी पंजाब वगळता देशाचा राजकीय नकाशा फारसा बदलला नाही. भाजपने चार राज्यांच्या नकाशावर आपला भगवा रंग कायम ठेवला. काँग्रेसच्या पंजातून पंजाब मात्र निसटला. या निकालाचा आणखी महत्त्वाचा अर्थ म्हणजे, राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या आम आदमी पक्षाच्या हाती आता दिल्लीसह दोन राज्ये गेली आहेत आणि राष्ट्रीय राजकारण करणार्‍या काँग्रेसकडे पंजाब गमावल्याने आता राजस्थान आणि छत्तीसगड ही दोनच राज्ये उरली आहेत. आम आदमीचा राष्ट्रीय राजकारणात चंचूप्रवेश होत असताना, काँग्रेससारखा बलाढ्य पक्ष अस्ताला निघाला आहे, हा या निवडणुकीत मतदारांनी दिलेला आणखी एक निकाल समजावा लागेल.

गोव्यात तीन दाम्पत्ये विजयी

भाजपतर्फे यावेळी वाळपईतून विश्वजित राणे, तर पर्येतून त्यांच्या पत्नी डॉ. दिव्या राणे आणि पणजीतून बाबूश मोन्सेरात व ताळगावमधून जेनिफर मोन्सेरात ही दोन दाम्पत्ये विजयी झाली आहेत. काँग्रेसचे मायकल लोबो व त्यांच्या पत्नी डिलायला अनुक्रमे कळंगूट आणि शिवोली मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.

Back to top button