

ज्ञानेश्र्वर बिजले
उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष अडीचशेपेक्षा अधिक जागांची आघाडी मिळवत सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येथे झालेल्या दुरंगी लढतीत समाजवादी पक्षाने गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट जागांवर आघाडी मिळवली आहे तरीदेखील ते बहुमतापासून खूप दूर आहेत.
भाजप सध्या राज्यात आघाडीवर असले तरीदेखील मतमोजणीचा वेग अत्यंत कमी आहे सुमारे 100 जागांवर आघाडीवर असलेल्या उमेदवारांचे मताधिक्य हे एक हजार पेक्षा कमी आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते हे अद्यापही आशावादी आहेत; मात्र भाजप दुपारी दोन वाजेपर्यंत 262 जागांवर तर समाजवादी पक्ष 136 जागांवर आघाडीवर होता. बसपा आणि काँग्रेस हे अनुक्रमे दोन आणि एक एवढ्यात जागेवर आघाडीवर असल्यामुळे ही निवडणूक भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष अशी थेट झाल्याचे दिसून येते.
निवडणुकीच्या काळात गेल्या दोन महिन्यात उत्तर प्रदेशात सत्ताधाऱ्याविरुद्ध वातावरण निर्माण झाले असले तरी, भाजपची संघटनात्मक ताकद खूप मोठी आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी बूथ पातळीवर लक्ष केंद्रित करीत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. मतदानाच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये अवध, बुंदेलखंड या भागात भाजप जास्त जागा घेईल असा अंदाज होता. तो खरा ठरल्याचे दिसत आहे.
शेतकरी आंदोलन झालेल्या पश्चिम उत्तर प्रदेशातही भाजपने आघाडी घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे प्रचाराची आघाडी सांभाळली होती. राष्ट्रीय लोकदल यांनी येथे जाट समुदायांची मते एकगठ्ठा मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना फारसे यश आलेले नाही त्यांना केवळ 8 जागांवर आघाडी मिळाली आहे. मतदानाचा दुसरा टप्पा असलेल्या मुस्लिम बहुल प्रदेशात समाजवादी पक्षाने ज्यादा जागांवर आघाडी मिळवल्याचे दिसून येते. शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये, म्हणजे पूर्वांचल आणि पूर्व उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने लहान पक्षांची आघाडी केली होती. तेथे त्यांना चांगले यश मिळाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागात वाराणसी येथे दोन दिवस मुक्काम ठोकला. तसेच गोरखपुर मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. त्यामुळे या भागात भाजपलाही चांगल्या जागांवर आघाडी मिळवत आहे. सर्वसाधारणपणे पाहिले तर समाजवादी पक्षाने त्यांच्या जागा वाटताना यादव आणि मुस्लिम समाजाची मते एकट्याने घेतल्याचे दिसून येते. त्याच वेळी काही ठिकाणी त्यांना ओबीसीची साथ मिळाली आहे. मात्र बहुजन समाज पक्षाची मते खूप कमी झाल्याने दलितांची मते ही समाजवादी पक्षाला विरोध करण्यासाठी भाजपच्या पारड्यात पडली असल्याचे दिसून येते. विशेषतः जाट समाजाने काही प्रमाणात भाजपच्या पाळण्यात मते टाकली पारड्यात मते टाकली.