Navjot Singh Sidhu : नवज्‍योत सिंग सिद्धू यांची राजकीय कारर्कीद धोक्‍यात? | पुढारी

Navjot Singh Sidhu : नवज्‍योत सिंग सिद्धू यांची राजकीय कारर्कीद धोक्‍यात?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
पंजाब विधानसभा निवडणूक निकालांनी अनेक दिग्‍गज नेत्‍यांना झटका दिला आहे. आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे.  पंजाबचे मुख्‍यमंत्रीपदासाठी कॅप्‍टन अमरिंदर सिंग यांच्‍याविरोधात बंडखोरी करणारे नवज्‍योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu ) यांचे मुख्‍यमंत्रीपदाचे स्‍वप्‍न भंगले असून, अमृतसर पूर्व मतदारसंघात त्‍यांचा पराभव झाल्‍यामुळे त्‍यांची राजकीय कारर्कीद धोक्‍यात आल्‍याचे मत राजकीय विश्‍लेषक व्‍यक्‍त करत आहेत. अमरिंदर सिंग हे पराभूत झाले असून त्‍यांनी काँग्रेसविरोधात केलेले बंडही आता फसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

अमृतसर पूर्व मतदारसंघातील मतमोजणी सुरु आहे. येथे नवजोत सिद्धू पिछाडीवर पडले आहे. मतमोजणीच्‍या सहाव्‍या फेरीनंतर येथे आम आदमी पार्टीच्‍या जीवनजोत कौर या १८ हजार ७८२ मतांनी आघाडीवर आहेत. ५ हजार ४०६ मते घेत सिद्धू दुसर्‍या स्‍थानी आहेत. तर  अकाली दलाचे बिक्रम मजीठिया १२ हजार ६२८ मते घेत तिसर्‍या स्‍थानावर हाेते. अखेर सिद्धू आणि मजीठिया यांचा पराभव करत आपच्‍या जीवनजाेत काैर यांनी बाजी मारली आहे.

Navjot Singh Sidhu : सिद्धू आणि अमरिंदर सिंग संघर्षाचा काँग्रेसला फटका

पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष नवज्‍योत सिंग सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्‍याबरोबर मतभेदामुळे टोकाची भूमिका घेतली. काँग्रेसने सिद्धू यांच्‍या बाजूने कौल दिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्‍ठी देत पंजाब लोक काँग्रेस पक्ष स्‍थापन केला. अमरिंदर सिंग यांना हटवून मुख्‍यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडेल, अशी आशा नवज्‍योत सिंग सिद्धू होती पण त्‍यांचा अपेक्षाभंग झाला. काँग्रेसने चरणजीत सिंग चन्‍नी यांच्‍याकडे मुख्‍यमंत्रीपद सोपवले. आता विधानसभा निवडणूक निकालात अंतर्गत संघर्षामुळेच काँग्रेसला फटका बसल्‍याचे दिसत आहे.

२०१७ विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून काँग्रेसवासी झालेले नवज्‍योत सिंग सिद्धू यांच्‍यासाठी ही निवडणूक महत्‍वपूर्ण होती. काँग्रेसला केवळ १८ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भापप आणि अकाली दलासही नामुष्‍कीजनक पराभवास सामोरे जावे लागले आहे. आता विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे नवज्‍योत सिंग सिद्धू यांची राजकीय कारर्कीद धोक्‍यात येण्‍याची शक्‍यता राजकीय विश्‍लेषक व्‍यक्‍त करत आहेत.

हेही वाचलं का?

 

Back to top button