पुढारी ऑनलाईन डेस्क :
अवघ्या काही तासांवर येवून ठेपलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. या निवडणुकीत भाजप, समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या बहुतांश सर्वेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. आता या पाठोपाठ काही ज्योतिषांनीही उत्तर प्रदेशमधील निवडणूक निकालावर भविष्यवाणी ( Exit Polls of Astrologers ) केली आहे. जाणून घेवूया, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोणत्या नेत्याचे तारे चमकणार ते…..
ज्योतिषी निधी मिश्रा यांनी म्हटलं आहे की, 'योगी आदित्यनाथ यांना ग्रहमान सध्या चांगले आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील. तसेच त्यांच्या लोकप्रियतेमध्येही वाढ होणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळतील'.
केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या ज्योतिष विभागाचे सहायक आचार्य डॉ. अश्विनी पांडेय यांनी म्हटले आहे की, 'यंदाच्या वर्षीचे ग्रहमान योगीआदित्यनाथ यांच्यासाठी खपूच अनुकूल आहे. विरोधी पक्षाचा पराभव करुन ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. १० मार्च रोजी विधानसभा निवडणूक निकाल आहे. गुरुवारचा दिवस असून रोहिणी नक्षत्र योगावर हा निकाल लागत आहे. रोहिणी नक्षत्राचे कार्य सृजन असून ते सकारात्मक संकेत देत आहे. वृषभ राशी ही व्यापारी वर्गाला शुभ आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपचे सरकार बनेल.'
ज्योतिषाचार्य सुमति विजयवर्गीय यांनी म्हटले आहे की, 'योगी आदित्यनाथ यांची लग्न रास सिंह असून चंद्र राश वृषभ आहे. लग्नेश सूर्य हा राजयोगात असून तो पंचम भावात आहे. तर दशम भावात चंद व शनि यांची युति आहे. हा युति संन्यासला कारक आहे. तसेच संबंधित व्यक्ती ही मठाची महंत बनू शकते. शुक्र हा शनिच्या राशीत असल्याने संबंधित व्यक्तीला भौतिक सुखाची आवड कमी असते. अष्टम स्थानात असणारा मंगळमुळे या व्यक्तीचे वतृत्व अत्यंत प्रभावी असते. सध्याचे योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीतील ग्रहमान पाहता ते पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याचे योग आहेत', असेही त्यांनी नमूद केले.
अखिलेश यादव यांची लग्न रास तुला असून चंद्र रास मेष आहे. त्यांच्या कुंडलीतील ग्रहमानानुसार ते लोकप्रिय नेते आहेत. सध्या त्यांना गुरुची महादशा तर शुक्राची अंतर्दशा सुरु आहे. त्यामुळे त्यांना अंतर्गत संघर्ष, अडचणी आणि आरोप-प्रत्यारोपांचा सामना करावा लागेल, असेही भाकित सुमति विजयवर्गीय यांनी केले आहे. योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव या दोघांच्या कुंडलीची तुलना करता योगी आदित्यनाथ यांना प्रबल राजयोग आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालावर अंदाज व्यक्त करताना अयोध्यामधील ज्योतिषी प्रवीण शर्मा म्हणतात, विपरीत राजयोगाचा समाजवादी पार्टीला लाभ होईल;पण अतिरिक्त लाभानंतरही अंतिमत: सत्ता स्थापन करण्यासाठी लागणार्या बहुमताच्या आकड्यापर्यंत हा पक्ष पोहचण्याची शक्यता कमी आहे. भाजपचे ग्रहमान खडतर आहे;पण समाजवादी पार्टीपेक्षा या पक्षाचे नुकसान कमी होईल. मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा भाजपच्या जागा कमी होतील;पण सत्ता अखेर भाजपकडेच राहिल.
मेरठमधील ज्योतिषी विनोद त्यागी आणि मथुरामधील आलोक गुप्ता यांनी आपल्या भविष्यवाणीत म्हटलं आहे की, योगी आदित्यनाथ यांचे ग्रहमान खूपच चांगले आहे; त्यांच्या कुंडलीनुसार भाजपचा विजय निश्चित आहे;पण भाजपचे ग्रहमान हे सध्या चांगले संकेत देत नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये भाजप २०० पेक्षा कमी जागांवर विजय मिळेल. मणिपूर वगळता भाजपला कोठेही विजय मिळणार नाही.
योध्यामधील आचार्य शिवेंद्र यांनी म्हटलं आहे की, 'अखिलेश यांच्या कुंडलीतील सध्याचे ग्रहमान हे अनुकूल नाही. त्यामुळे समाजवादी पार्टीला उत्तर प्रदेशमध्ये बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र समाजवादी पार्टीच्या जागा निश्चित वाढतील. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेसाठी जोरदार संघर्ष होईल', असेही भाकित त्यांनी केले आहे.
हेही वाचलं का ?
पाहा व्हिडीओ :