Russia-Ukraine war : रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांत 4 बालकांसह 31 जण ठार

कीव्ह ः रशियाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या पुलाखालून युक्रेनच्या नागरिकांनी नवी वाट तयार केली.
कीव्ह ः रशियाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या पुलाखालून युक्रेनच्या नागरिकांनी नवी वाट तयार केली.

मॉस्को/कीव्ह ; वृत्तसंस्था : रशियाने युक्रेनमधील (Russia-Ukraine war) विविध शहरांतून चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांत 31 जण ठार झाल्याचे मंगळवारी समोर आले. रशियाने मंगळवारी युक्रेनच्या सुमी शहरावर क्षेपणास्त्र हल्ले चढविले. त्यात 2 बालकांसह 10 जणांचा मृत्यू झाला. मार्किव्ह बेकरीवर रशियन हल्ल्यात 13 लोक मरण पावल्याचे समोर आले असून, कीव्हमध्ये सामान्य लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बनविण्यात आलेल्या मानवीय कॉरिडोरवर झालेल्या रशियन हल्ल्यात 2 बालकांसह 8 जण मरण पावले.

युद्धाच्या तेराव्या दिवशीही रशिया आणि युक्रेनदरम्यान वार-पलटवार (Russia-Ukraine war) सुरू आहेत. दुसरीकडे, रशियाचे मेजर जनरल व्हिटॅली गॅरासिमोव्ह यांना ठार मारल्याचा दावा युक्रेनने केला.

खार्कोव्हनजीक दोन्ही सैन्यांच्या लढाईत ते मारले गेले, असे युक्रेनने म्हटले आहे. कीव्ह, खार्कोव्हमधून सर्वच भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे युक्रेनबाहेर काढण्यात आलेले आहे. असे असले तरी सुमीमध्ये बरेच भारतीय विद्यार्थी अडकून होते, ते सारेच सुदैवाने सुरक्षित असून, सुमी शहरातूनही सर्व 694 भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

यादरम्यान, 30 वर्षांतही रशियाची इतकी शस्त्रास्त्रे संपुष्टात आली नसती जितकी युद्धाच्या या 13 दिवसांत नष्ट झाली आहेत, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. आजवर रशियाच्या 12 हजारहून अधिक सैनिकांचा खात्मा युक्रेनने केला आहे. रशियाचे 303 रणगाडे, 48 लढाऊ विमाने उद्ध्वस्त केली आहेत, असेही झेलेन्स्की यांनी सांगितले.

युक्रेनने तडजोड करावी

युक्रेनचे माजी राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांनी, कुठल्याही तडजोडीला तयार व्हावे आणि युद्ध थांबवावे, असे आवाहन झेलेन्स्की यांना उद्देशून केले आहे.

17 लाखांवर लोकांचे स्थलांतर

युद्धामुळे युक्रेनमधून बाहेर पडलेल्यांची संख्या 17 लाखांवर (17 लाख 35 हजार) गेल्याचे संयुक्‍त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या संस्थेने म्हटले आहे.

रशियाच्याचार अटी

युक्रेन-रशियादरम्यान तिसर्‍या फेरीच्या बैठकीत रशियाने युक्रेनसमोर युद्धविरामासाठी 4 अटी ठेवल्या आहेत. अटी मान्य केल्यास आम्ही त्वरित हल्ले थांबवू, असे रशियातर्फे सांगण्यात आले. युक्रेननेही लष्करी कारवाई थांबवली पाहिजे. युक्रेनने त्यांच्या संविधानात बदल करावेत. कोणत्याही गटात सामील होणार नाही, असे संविधानात नमूद करावे. युक्रेनने क्रिमियाला रशियन प्रदेश म्हणून मान्यता द्यावी. डोनेस्टक आणि लुहान्स्क या प्रदेशांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी, या अटी रशियाने घातल्या आहेत.

मंगळवारच्या घडामोडी…

 * जग असेच या युद्धापासून लांब राहिले, तर आम्ही सर्वच पराभूत होणार आहोत, असे झेलेन्स्की म्हणाले.
* जर्मनीची गॅस पाईपलाईन बंद करण्याचा इशारा रशियाने दिला.
* आजवर 203 शाळा आणि 34 रुग्णालये रशियन हल्ल्यात उद्ध्वस्त झाली आहेत.
* बंद पडलेल्या चेर्नोबिल न्यूक्‍लिअर प्लांटमध्ये युक्रेन डर्टी बॉम्ब विकसित करत होता, असा आरोप रशियाने केला.
* राजधानी कीव्हसह मारियुपोल आणि वोल्नोवाखातील रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर लोक घरदार सोडून निघाले आहेत.
* ब्रिटनने युक्रेनहून येणार्‍यांना व्हिसाशिवाय देशात प्रवेश देण्यास नकार दिला.
* सुमीत 3 दिवसांत रशियाने 500 किलो वजनाचे अनेक बॉम्ब टाकले, असे समोर आले.

पाच शहरांत युद्धविराम

लागोपाठ दुसर्‍या दिवशी नागरिकांना सुरक्षितपणे युद्धभूमीतून बाहेर पडता यावे म्हणून युद्धविराम जाहीर करणार असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. कीव्ह, खार्कोव्ह, सुमी, चेर्निहिव्ह, मारियुपोल शहरांतून काही काळ युद्धविराम पाळण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news