ऑपरेशन गंगा! ९ बांगलादेशींची युक्रेनमधून सुटका, शेख हसीना यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

ऑपरेशन गंगा! ९ बांगलादेशींची युक्रेनमधून सुटका, शेख हसीना यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी (PM of Bangladesh Sheikh Hasina) 'ऑपरेशन गंगा' (Operation Ganga) अंतर्गत युक्रेनमधून बांगलादेशच्या ९ नागरिकांची सुटका केल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत भारतासह नेपाळी, ट्युनिशियाच्या विद्यार्थ्यांचीही सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना देशात परत घेवून येण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत ४२० भारतीयांना मंगळवारी, २ विशेष नागरी विमानांनी सुचावा येथून परत आणण्यात आले. २२ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेतून आतापर्यंत जवळपास १८ हजार भारतीयांना विशेष विमानांनी मायदेशी परत आणले आहे. नागरी विमानांनी परत आणलेल्या भारतीयांची संख्या आता १५ हजार ५२१ पर्यंत पोहोचली आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीय हवाई दलाने २४६७ प्रवाशांना परत आणण्यासाठी १२ उड्डाणे केली आणि ३२ टन मदत साहित्य वाहून नेले.

२१ नागरी विमानांनी ४,५७५ प्रवाशांना बुखारेस्ट येथून, ९ विमानांनी १,८२० प्रवाशांना सुचावा येथून, २८ विमानांनी ५,५७१ प्रवाशांना बुडापेस्ट येथून, ५ विमानांनी ९०९ प्रवाशांना कॉशीक्जे येथून, ११ विमानांनी २,४०४ भारतीयांना शाझाव येथून आणि २४२ व्यक्तींना एका विमानाने कीव्ह येथून परत आणण्यात आले.

एअर एशियाच्या ३ उड्डाणातून ५००, एअर इंडियाच्या १४ उड्डाणातून ३ हजार २५०, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ९ उड्डाणातून १ हजार ६५२, गो फर्स्टच्या ६ उड्डाणातून १ हजार १०१, इंडिगोच्या ३४ उड्डाणातून ७ हजार ४०४, स्पाईस जेटच्या ९ उड्डाणातून १ हजार ६१४ प्रवाशांना मायदेशी परत आणण्यात आले. आतापर्यंत ७५ उड्डाणातून १५ हजार ५२१ भारतीयांना परत आणण्यात आले असल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news