Video Bomb : ठाकरे सरकारवर फडणवीसांचा व्हिडीओ बॉम्ब! क्लिप सादर, ‘कटामागे मोठे साहेब’

Video Bomb : ठाकरे सरकारवर फडणवीसांचा व्हिडीओ बॉम्ब! क्लिप सादर, ‘कटामागे मोठे साहेब’

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपच्या अनेक नेत्यांवर सूड उगविण्याचे कसे षड्यंत्र रचत आहेत, साक्षीदारांपासून ते पुराव्यांपर्यंत सारे मॅनेज केले जाते आहे, असा गौप्यस्फोट करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ठाकरे सरकारवर व्हिडीओ बॉम्ब टाकला. (Video Bomb)

या बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना अडकविण्याच्या कटाचा पर्दाफाश करणार्‍या एका स्टिंग ऑपरेशनची व्हिडीओ क्लिप फडणवीस यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना सादर केली.

हा तर महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना आहे. सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत आहेत, असा गंभीर आरोपही फडणवीस यांनी व्हिडीओ क्लिपचा हवाला देत केला. या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली.

सुमारे सव्वाशे तासांच्या या स्टिंग ऑपरेशनमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून त्यांनी सादर केला. विरोधकांनी नियम 293 अन्वये उपस्थित केलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेत त्यांनी हा बॉम्ब फोडल्याने खळबळ उडाली आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात षड्यंत्र रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा या व्हिडीओ क्लिपमध्ये आहे. शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून स्पष्ट होत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. या प्रकरणातील संपूर्ण एफआयआर या वकिलांनीच तयार करून दिला असून, टाकलेल्या छाप्याच्या वेळी संपूर्ण बारकाईने नियोजन त्यांनीच केलेले आहे.

Video Bomb : ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून 'मोका

ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून 'मोका' लावायला कसे सांगितले, त्यातून शासन पातळीवर कशा बैठका झाल्या, त्यात मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक कसे उपस्थित होते, याचा संपूर्ण उलगडा या सरकारी वकिलांनी केला आहे. प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे पॉझिटिव्ह केले, याची संपूर्ण कथा वकील प्रवीण चव्हाण सांगताना दिसत आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली. (Video Bomb)

या क्लिपमध्ये माजी आमदार अनिल गोटे यांचा या वकिलांशी प्रत्यक्ष संवादही आहे, फोन कॉल्स आहेत, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या भेटी व बैठकी याचे इत्थंभूत तपशील त्यात आहेत. अजित पवार हे ऐकत नाहीत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कसे कामाचे नाहीत, हे सांगताना मोठ्या साहेबांच्या कशा सूचना आहेत. मोठे साहेब कसे कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत आणि उगाच पोलिस ठाण्याच्या

डायरीत नोंद नको म्हणून पडद्याआडून काय काय निर्देश देतात, याची माहिती वकिलांनी या व्हिडीओ क्लिपमध्ये दिली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात संशयाची सुई ही शरद पवार यांच्याकडेच असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेते राष्ट्रवादीच्या कसे टार्गेटवर आहेत आणि त्यांना कसे कसे संपविण्यात येणार आहे, त्यातून कुणाचे काय लाभ होणार आहेत, याचाही तपशील यामध्ये आहे, त्यामुळे या क्लिपमुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

Video Bomb : जयंत पाटील यांचाही संवाद क्लिपमध्ये

अनिल देशमुख यांनी केवळ बदल्यांमध्ये नाही, तर इतरही स्रोतांतून कसे पैसे कमावले, छगन भुजबळ यांना पैसे देऊन कसे सोडण्यात आले, मुंबईची कोण वकील आहे, जी जजेसना कशी मॅनेज करते, याचेही तपशील यात आहेत. संजय राऊत यांची भेट घेऊन काय नियोजन करायचे, पुढच्या काळात कोणत्या ठिकाणी, कोणते गुन्हे दाखल करण्यात येणार, नवाब मलिक यांनी काय जबानी द्यायची, त्यातूनसुद्धा देवेंद्र फडणवीस यांना कसे फसविता येईल, रश्मी शुक्ला प्रकरणात काय ओपिनियन द्यायचे, राजकीय नेत्यांनी आपल्याला त्यासाठी कशी मोकळीक दिली आहे, अशी सर्व माहिती वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली आहे. सोबतच जयंत पाटील यांच्याशी साधलेला संवादसुद्धा आहे. एकूणच अतिशय स्फोटक अशा या स्टिंग ऑपरेशनमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सीबीआय चौकशीची मागणी

हे अत्यंत गंभीर आणि स्फोटक प्रकरण आहे. त्यामध्ये सरकारी वकील, पोलिस अधिकारी आणि मंत्री यांचे संवाद आहेत. सर्वजण मिळून विरोधकांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे षड्यंत्र रचत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास राज्यातील पोलिस यंत्रणेकडून होणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी ही सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. जर सरकारने सीबीआय चौकशी केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

आरोपात तथ्य नाही, चौकशीला तयार ः अ‍ॅड. प्रवीण चव्हाण

फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. त्यांनी दिलेल्या व्हिडीओ क्लिपमध्येही कोणतीही सत्यता नाही. त्यामुळे यासंबंधी चौकशी झाली, तरी माझी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे, असे अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी सांगितले. हे जे स्टिंग ऑपरेशन आहे ते काहींनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेले असावे; पण त्यातील आवाजही खरा असायला हवा. यापूर्वी अनेकवेळा आवाज खोटे निघाले आहेत. माझ्याकडे ज्या काही केस आहेत त्यामध्ये कागदपत्रे, पुरावे सादर करणे, प्रतिज्ञापत्र तयार करणे माझे काम आहे. मी ते करीत आहे. या आरोपांमुळे माझे काम थांबेल असा प्रयत्न आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

विरोधकांचा महाकत्तलखाना करण्याचा कट

मोठ्या साहेबांना कसे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांना संपवायचे आहे, त्यासाठी त्यांचे कोणते निर्देश त्यांना प्राप्त झाले आहेत, भाजपच्या नेत्यांना गुंतविण्यासाठी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय पांडे यांना कसे बसविण्यात आले. त्याची कबुली पांडे यांनी दिली, याचे तपशील या व्हिडीओ क्लिपमध्ये असल्याचे सांगत फडणवीस यांनी महाविकास आघाडी भाजप नेत्यांविरोधात कट करून विरोधकांचा महाकत्तलखाना चालविण्याच्या तयारीत आहे, असा हल्ला चढविला.

कटात महाविकास आघाडीचे अनेक नेते, पोलिस अधिकारी, सरकारी वकिलांचा सहभाग
सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा
भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरुद्ध षड्यंत्र
सव्वाशे तासांचे रेकॉर्डिंग पुरावे सभापतींना सादर
सीबीआय चौकशीची मागणी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news