पुढारी ऑनलाईन डेस्क
भारतीय फिनटेक कंपनी 'भारतपे' (BharatPe) चे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर (SIAC) ने बोर्डाची चौकशी थांबवण्यासाठी त्यांची याचिका फेटाळल्यानंतर एका दिवसानंतर अश्नीर ग्रोव्हर 'भारतपे'च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन पायउतार झाले आहेत.
बोर्डाला लिहिलेल्या पत्रात, ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी म्हटले आहे की त्यांना काही लोकांकडून विनाकारण लक्ष्य केले जात आहे आणि अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली गेली आहे. "मी व्यथित मनाने हे लिहित आहे कारण आज मला एका कंपनीचा निरोप घेण्यास भाग पाडले जात आहे ज्याचा मी संस्थापक आहे. मी अभिमानाने सांगतो की आज ही कंपनी फिनटेक जगतात आघाडीवर आहे. २०२२ च्या सुरुवातीपासून, दुर्दैवाने, मला आणि माझ्या कुटुंबाला काही लोकांनी वादात अडकवले. काही लोकांनी केवळ माझ्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली नाही तर ते कंपनीच्या प्रतिष्ठेलाही धक्का लावत आहेत," असे ग्रोव्हर यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे.
मी माझे गुंतवणूकदार आणि व्यवस्थापन यांच्या विरुद्धच्या दीर्घ, एकाकी लढाईत वेळ वाया घालवू शकत नाही. दुर्दैवाने, या लढाईत व्यवस्थापनाने 'भारतपे'कडे दुर्लक्ष केले आहे, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
'भारतपे'चे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांच्या पत्नी माधुरी जैन यांना हेड ऑफ कंट्रोल पदावरून बडतर्फ करण्यात आले होते. कंपनीच्या निधीचा वैयक्तिक कामासाठी गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अश्नीर ग्रोव्हर आणि माधुरी जैन यांनी आरोप फेटाळत कंपनीचे चेअरमन रजनीश कुमार तसेच सहसंस्थापक भाविक कोलाडिया व सीईओ सुहेल समीर यांनी षड्यंत्र रचल्याचा आरोप करत पलटवार केला होता.
हे ही वाचा :