Madhabi Puri Buch : माधवी पुरी बूच बनल्या ‘सेबी’च्या अध्यक्ष, प्रथमच महिलेला मान | पुढारी

Madhabi Puri Buch : माधवी पुरी बूच बनल्या 'सेबी'च्या अध्यक्ष, प्रथमच महिलेला मान

पुढारी ऑनलाईन डेस्क

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या अध्यक्षपदी माधवी पुरी बूच (Madhabi Puri Buch) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेबीने याबाबतची घोषणा केली आहे. त्यांची नियुक्ती ही सुरुवातीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी आहे, असे सेबीने म्हटले आहे. सेबीचे विद्यमान अध्यक्ष अजय त्यागी यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यांच्या जागी आता माधवी पुरी बूच यांनी घेतली आहे. सेबी ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. विशेष म्हणजे सेबीच्या अध्यक्षपदी प्रथमच एका महिलेची नियुक्ती झाली आहे.

“माजी पूर्णवेळ सदस्या माधवी पुरी बूच यांची सेबीच्या अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने मान्यता दिली आहे. त्यांची नियुक्ती ही तीन वर्षांच्या कालावधीसाठी असेल, ” असे सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. अर्थ मंत्रालयानेही ऑक्टोबरमध्ये सेबी अध्यक्षपदासाठी अर्ज मागवले होते, ज्याची अंतिम मुदत ६ डिसेंबर होती.

कोण आहेत माधवी पुरी

माधवी पुरी (Madhabi Puri Buch) यांनी १२ वर्षे ICICI बँकेत विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी १९९७ ते २००२ दरम्यान मार्केटिंग आणि सेल्स हेड म्हणून पाच वर्षे काम पाहिले होते. तसेच त्यांनी २००२ ते २००३ दरम्यान प्रोडेक्ट डेव्हलमेंट हेड म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांनी २००४ ते २००६ दरम्यान हेड ऑफ ऑपरेशन आणि २००६ ते २००९ दरम्यान म्हणून एक्झ्युटिव्ह डायरेक्टर काम पाहिले होते. त्यांना २००९ मध्ये ICICI सिक्युरिटीजच्या CEO म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी या पदावर २०११ पर्यंत काम केले. माधवी पुरी एप्रिल २०१७ मध्ये SEBI मध्ये पूर्णवेळ संचालक म्हणून रुजू झाल्या होत्या. माधवी ह्या दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजच्या तसेच अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM-A) च्या माजी विद्यार्थी आहेत.

शेअर बाजारांत जे काही कामकाज चालते त्याचे नियमन करणे. गुंतवणूकदारांच्या अधिकारांचे संरक्षण करणे तसेच शेअर बाजारातील गैरप्रकाराला आळा घालण्याचे काम सेबी करते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : युक्रेन एकाकी | Pudhari Podcast

Back to top button