

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 (IPL 2022)च्या मेगा लिलावात चर्चेचा विषय बनलेल्या पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) संघाने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. संघाने आपला नवा कर्णधार म्हणून आघाडीचा भारतीय फलंदाज मयंक अग्रवालची (mayank agarwal) नियुक्ती केली आहे. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्सने मयंकला 14 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. त्यानंतर हा फलंदाज भविष्यात संघाचे नेतृत्व करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती आणि आता असेच काहीसे घडले आहे.
मयंक अग्रवाल (mayank agarwal) 2018 पासून पंजाब फ्रँचायझीकडून आहे. त्यावेळी त्याला पंजाबने केवळ एक कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्या सीझनपासून त्याने माजी कर्णधार केएल राहुलसह संघासाठी जबरदस्त कामगिरी केली. केएल राहुलने चार हंगामांनंतर फ्रँचायझीशी संबंध तोडले. आयपीएलच्या आगामी १५ व्या सीझनमध्ये तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
कर्णधार झाल्यानंतर मयंक (mayank agarwal) म्हणाला, 'या अद्भुत युनिटचे प्रतिनिधित्व करताना मला खूप अभिमान वाटतो. मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. ही जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे घेत आहे. मला खात्री आहे की या हंगामात पंजाब किंग्ज संघात आमच्याकडे असलेली प्रतिभा माझे काम सोपे करेल.'
मयंक अग्रवाल (mayank agarwal) हा पंजाब किंग्ससाठी एक दमदार फलंदाज राहिला आहे. त्याची फलंदाजीतील आकडेवारी पाहता त्याने पंजाबसाठी 47 सामन्यांत 144.25 च्या स्ट्राईक रेटने 1317 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर एका शतकाचीही नोंद आहे. गेल्या मोसमात केएल राहुलच्या अनुपस्थितीतही तो संघाची धुरा सांभाळताना दिसला होता.