COVID 19 guidelines : आरटी-पीसीआरची सक्ती रद्द; दोन्ही डोसचे प्रमाणपत्र असणाऱ्यांना देशात प्रवेश | पुढारी

COVID 19 guidelines : आरटी-पीसीआरची सक्ती रद्द; दोन्ही डोसचे प्रमाणपत्र असणाऱ्यांना देशात प्रवेश

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

COVID 19 guidelines : विदेशातून येणाऱ्या नागरिकांना आरटी-पीसीआर अहवाल (72 तास वैधता) घेऊन येण्याची सक्ती केंद्र सरकारने रद्द केली आहे. कोविड संदर्भातील नवी मार्गदर्शक तत्वे सरकारने गुरुवारी जारी केली, त्यानुसार लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणाऱ्यांना देशात प्रवेश दिला जाणार आहे.

सरकारने ओमायक्रॉन रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या देशांसाठीचे ‘ऍट रिस्क’ मार्किंग देखील हटविले आहे. भारतात आल्यानंतर प्रवाशांना ‘रँडम सॅम्पल’ देऊन विमानतळावरून बाहेर पडता येईल. एअर सुविधा पोर्टलवर ज्या प्रवाशांनी सेल्फ डिक्लरेशनच्या अनुषंगाने सर्व आवश्यक माहिती भरलेली आहे, तसेच आरटी-पीसीआर अहवाल किंवा दोन्ही डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडले आहे, अशा प्रवाशांनाच विमान कंपन्या बोर्डिंगची परवानगी देतील.

विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग केल्यानंतर केवळ लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच विमानात बसण्याची अनुमती असेल. देशात आल्यावर स्क्रीनिंगवेळी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना लगेच आयसोलेट केले जाईल व त्यांना आरोग्य सुविधा केंद्रात नेले जाईल. देशात आल्यानंतर सर्व रुग्णांनी पुढील 14 दिवस आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. येत्या 14 तारखेपासून वरील नियमावली अंमलात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. (COVID 19 guidelines)

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६७ हजार ८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,२४१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ लाख ६७ हजार ८८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ७ लाख ९० हजार ७८९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पॉझिटिव्हिटी रेट ४.४४ टक्क्यांवर आला आहे. देशात आतापर्यंत ५ लाख ६ हजार ५२० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : काय आहे मुंबईच्या प्रसिद्ध धोबीघाटाचा इतिहास ? : पुढारी ऑनलाईन स्पेशल

Back to top button