पुढारी ऑनलाईन डेस्क
Hijab Controversy : कर्नाटकातील सरकारी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून हिजाब समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले आहेत. बहुतांशी सरकारी तसेच खासगी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांत संघर्ष सुरू झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मलाला युसुफझाई (Malala Yousafzai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुलींना हिजाब घालून शाळेत जाऊ देण्यापासून रोखणे भयंकर असल्याचे मलाला यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"कॉलेज मुलींना अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना हिजाब घालून शाळेत जाऊ देण्यापासून रोखणे भयंकर आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लीम महिलांची उपेक्षा थांबवली पाहिजे." असे मलाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
कर्नाटकमध्ये हिजाब वरुन वाद निर्माण झाला आहे. हिजाबला विरोध म्हणून अनेक विद्यार्थी भगवे शेले घालून कॉलेजमध्ये जात आहेत. त्यात शिमोगा जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये राष्ट्रध्वजाच्या स्तंभावर भगवा ध्वज फडकविण्यात आला, तर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत दगडफेक झाली. त्यात एक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. परिणामी हा संघर्ष आणखी चिघळू नये यासाठी आज बुधवार (दि.९) पासून कर्नाटकातील सर्व महाविद्यालये तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. शाळा मात्र सुरू राहणार आहेत.
हिजाब घालून आल्यानंतर उडपी, कुंदापूर, चिक्कमंगळूर या शहरांमधील कॉलेज व्यवस्थापनांनी या विद्यार्थिनींना कॉलेजच्या गेटवरूनच परत पाठवले. त्यानंतर त्यातील काही विद्यार्थिनींनी न्यायालयात याचिका दाखल करून हिजाब हा आमचा हक्क असल्याचा दावा केला.
हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. आज बुधवारी (दि.९) दुपारी २.३० वाजता सुनावणी सुरू राहील, असे सांगितले. तोपर्यंत राज्यातील विद्यार्थी, नागरिकांनी संयम व शांतता राखावी, असे आवाहन केले.
हिजाब घालून (Hijab Controversy) वर्गात बसण्याची परवानगी देण्याची मागणी करून काही विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर अॅडव्होकेट जनरल प्रभूलिंग नावदगी यांनी युक्तिवाद केला. गणवेश लागू करणे हा प्रत्येक महाविद्यालयाच्या स्वायत्ततेचा प्रश्न आहे. त्यामध्ये सरकार मध्यस्थी करणार नाही. कॉलेज सुधारणा मंडळांनी यावर ठोस निर्णय घ्यावा, असे नावदगी यांनी म्हटले.
याआधी चिक्कमंगळूर येथील महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केशरी शाल परिधान करून कॅम्पसमध्ये मुस्लिम मुली हिजाब परिधान करत असल्याबद्दल निषेध नोंदवला होता. त्यानंतर शिमोगा जिल्ह्यातील सरकारी महाविद्यालयात हिजाबवरुन वाद निर्माण झाला होता. याआधी कुंदनपूर येथील महाविद्यालयात हिजाबला विरोध झाला होता. तसेच उडुपी जिल्ह्यातील प्री-यूनिवर्सिटीच्या महाविद्यालयात ७ विद्यार्थिनींना हिजाब घातल्याबद्दल वर्गात प्रवेश दिला नव्हता. समान ड्रेस कोडच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे महाविद्यालय प्रशासनाने म्हटले होते.