कोलकाता; वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमधील जलपायगुडी येथील डोमोहानी गावात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता भीषण रेल्वे दुर्घटना घडली. बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. 45 हून अधिक लोक जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत कित्येकजण रेल्वे डब्यांमध्ये अडकून पडले होते. जलपायगुडीच्या जिल्हाधिकार्यांनी 9 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही दुर्घटना कशी झाली, याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अनेक प्रवासी अजूनही डब्यांतून अडकलेले आहेत. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंधार आणि धुक्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेनंतर लगेचच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बिकानेर एक्स्प्रेस मंगळवारी रात्री राजस्थानातील बिकानेरहून निघाली होती. गुरुवारी सकाळी 5.44 वाजता पाटणा रेल्वे स्थानकावरून ती गुवाहाटीसाठी निघाली होती. 8134054999 हा आपत्कालीन नंबर रेल्वेने जारी केला आहे. 036-2731622 आणि 036-2731623 हे हेल्पलाईन नंबरही जारी केले आहेत. बिकानेरहून रेल्वे निघाली तेव्हा 308 प्रवासी होते.दुर्घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून, त्यात डबे रुळावरून उतरताना दिसत आहेत.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. तसेच गंभीर जखमींसाठी 1 लाख, तर जखमींसाठी प्रत्येकी 25 हजारांची मदत देणार असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधून दुर्घटनेविषयी चर्चा केली. तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून दुर्घटना आणि बचावकार्याची माहिती घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दुर्घटनेतील मृतांप्रति शोकसंवेदना व्यक्त केली असून, जखमींना लवकरात लवकर आराम पडो, अशी प्रार्थना केली आहे.
हेही वाचलत का?