Cold Wave : आगामी आठवड्यात थंडीची लाट कायम राहणार | पुढारी

Cold Wave : आगामी आठवड्यात थंडीची लाट कायम राहणार

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून शीतलहर सुरू आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. परिणामी राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे राज्यातील कमालबरोबरच किमान तापमानात चांगलीच घट आली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत थंडीचा कडाका आहे. दरम्यान, हवामान कोरडे राहिल्यामुळे थंडीचा कडाका आणि लाट पुढील आठवडाभर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. (Cold Wave)

दरम्यान, गुरुवारी महाबळेश्वर शहराचे किमान तापमान 11.5 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले आहे. हे तापमान राज्यात नीचांकी आहे. उत्तर भारतात हरियाणा राज्याच्या आसपासच्या भागावर पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव वाढला आहे. हा प्रभाव पुढील चार ते पाच दिवस राहणार आहे. सध्या उत्तर भारतात शीतलहर आणि दाट धुके पसरले आहे.

त्यात 16 जानेवारीला हिमालयाच्या पायथ्याशी आणखी एक पश्चिमी चक्रावात सक्रिय होणार आहे. यामुळे या भागात थंडीची लाट वाढण्याची शक्यता आहे. राज्यात हवामान कोरडे राहून कडाक्याची थंडी पडली आहे. रात्रीबरोबरच दिवसादेखील थंडी चांगलीच जाणवत आहे.

उत्तर कर्नाटक ते उत्तर ओडिशादरम्यान 1 किमी उंचीवरील कमी दाब क्षेत्र पट्ट्यामुळे तसेच याच परिसरात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून वाहणार्‍या वार्‍याच्या टकरीमुळे मराठवाड्यात व विदर्भात मध्यम पावसाची शक्यता आहे.

Cold Wave : गुरुवारी नोंदले गेलेले किमान तापमान

मुंबई – 18, सांताक्रूझ – 17, रत्नागिरी – 17.4, डहाणू – 15.3, पुणे – 12.1, नगर – 13.4, जळगाव – 12, महाबळेश्वर – 11.5, मालेगाव – 11.6, सांगली – 13.5, सातारा – 12.3, सोलापूर – 16.2, औरंगाबाद – 12.5, परभणी – 14.4, नांदेड – 17.7, बीड – 15.7, अकोला – 15.6, बुलढाणा – 13, ब्रम्हपुरी – 15.4, गोंदिया – 11.8, नागपूर – 14, वाशिम – 12, वर्धा – 13.6.

कोल्हापूर जिल्ह्यात हाडे गोठवणार्‍या थंडीचा कडाका

कोल्हापूर जिल्ह्यात हाडे गोठवणार्‍या थंडीचा कडाका गुरुवारीही कायम होता. तापमानात फारशी वाढ झाली नसल्याने जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशीही हवेत कमालीचा गारठा राहिला. कोल्हापूर शहर आणि परिसर दाट धुक्यात हरवून गेला होता. शहरात सकाळी दहानंतरच सूर्यदर्शन झाले, इतकी धुक्याची तिव्रता होती.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पारा कमी होत चालला आहे. बुधवारी जिल्ह्यात यावर्षीच्या आजपर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली. पारा 12.8 अंशांपर्यंत खाली गेला होता. आज, गुरुवारी पहाटे थंडीने जिल्हा अक्षरश: गारठून गेला होता.

सकाळी कोल्हापूर शहर परिसरात धुके पडले. सकाळी सात-साडेसातनंतर धुक्याची तीव—ता वाढत गेली. रस्त्याने ये-जा करणार्‍यांच्याही अंगावरील कपडे दवबिंदूने ओले होत होते. गवत, झाडे, वेली आदींचा तर नजारा अद्भुत आणि विलोभनीय होता. मोकळ्या जागेत उभी केलेली वाहनेही नुकतीच पाणी मारून उभी केल्यासारखी दिसत होती.

सकाळी आठनंतर धुक्याची तीव्रता कमी होण्याऐवजी वाढतच गेली. वाढत्या धुक्यामुळे शहराच्या प्रमुख भागांतही वाहनधारकांना सकाळी दहा वाजेपर्यंत वाहनांचे दिवे लावूनच ये-जा करावी लागत होती. सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत धुक्याची तीव—ता इतकी होती की, अवघ्या दहा-बारा फुटांवरीलही नीट दिसत नव्हते.

वातावरण पुन्हा ढगाळ

धुक्यामुळे शहरातील रस्ते, हॉटेल्स आदी ठिकाणी सकाळी दिसणारी गर्दी आज तुलनेने खूपच कमी दिसत होती. अनेक रस्ते सकाळी आठ-नऊ वाजेपर्यंत ओस पडल्यासारखेच चित्र होते.

धुक्यामुळे सकाळी दहा वाजेपर्यंत सूर्यदर्शन झाले नव्हते. सव्वादहाच्या सुमारास काही काळ सूर्यदर्शन झाले. यानंतर वातावरण पुन्हा ढगाळ झाले. दुपारनंतरच शहरात लख्ख सूर्यदर्शन झाले. दिवसभर ऊन पडले, तरी आजही हवेत बोचरे वारे होते. यामुळे सायंकाळनंतरही थंडीची तीव्रता अधिक होती. उबदार कपडे परिधान करूनच नागरिकांना घराबाहेर पडावे लागत होते.

जिल्ह्यात आज 13.1 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. दैनंदिन सरासरी तापमानापेक्षा दोन अंशांनी पारा घसरला आहे. उद्या, शुक्रवारपासून तापमानात वाढ होईल, तसेच दोन दिवस वातावरण सकाळी ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Back to top button