

कानपूर/लखनौ ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश निवडणूक तारखांची घोषणा झाल्यानंतर भाजपला राज्यात एकापाठोपाठ एक खिंडार पडते आहे. एकापाठोपाठ एक मंत्री भाजप सोडत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत मंत्री धर्मसिंह सैनी यांच्यासह मुकेश वर्मा, विनय शाक्य आणि बालाप्रसाद अवस्थी या 4 आमदारांनी (मंत्र्यासह) राजीनामे सादर केले. (Uttar Pradesh Election)
मुकेश वर्मा शिकोहाबादचे, विनय शाक्य औरैयातील बिधुनाचे आमदार आहेत. धर्मसिंह सैनी, मुकेश वर्मा आणि विनय शाक्य यांनी स्वतंत्रपणे समाजवादी पक्षाच्या कार्यालयात अखिलेश यादव यांची भेट घेतली.
याआधी मंगळवारी योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी, तर बुधवारी दारासिंह चौहान यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. तीन दिवसांत तीन मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तीन मंत्र्यांसह या क्षणापर्यंत 14 आमदारांनी राजीनामे दिले आहेत.
सामाजिक न्यायाच्या लढ्यातील आणखी एक योद्धा सैनी यांच्या येण्याने समाजवादी पक्षाचे सकारात्मक राजकारण अधिक बलशाली बनले आहे, अशी प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी धर्मसिंह सैनी यांच्या भेटीनंतर व्यक्त केली.
स्वामी प्रसाद मौर्य (पडरौना, कुशीनगर), धर्मसिंह सैनी (नकुड, सहारनपूर), भगवती सागर (बिल्हौर), रोशनलाल वर्मा (तिलहर), विनय शाक्य बिधूना (औरैया), अवतारसिंह भडाना (मीरापूर), दारासिंह चौहान (मधुबन, मऊ), ब्रिजेश प्रजापती (तिंदवारी, बांदा), मुकेश वर्मा (शिकोहाबाद, फिरोजाबाद), दिग्विजय नारायण जय चौबे (खलिलाबाद), बालाप्रसाद अवस्थी (धौरहरा, लखीमपूूर), राकेश राठौर (सीतापूर), माधुरी वर्मा (नानपारा, बहराईच), आर. के. शर्मा (बिल्सी, बदायू).
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पाठोपाठ समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या आघाडीने गुरुवारी 29 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या 29 जागांपैकी 19 ठिकाणी रालोदचे उमेदवार आहेत. आग्रा जिल्ह्यातील नऊपैकी तीन जागा रालोद, तर 2 जागा सपा लढवणार आहे.
मथुरा जिल्ह्यातील पाच जागांपैकी तीन जागांवर रालोदचे उमेदवार असतील. समाजवादी पार्टी आणि रालोद आघाडी उत्तर प्रदेशात परिवर्तन घडवेल, असे सपाच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.