'मराठी पाटया'चे श्रेय फक्त आणि फक्त महाराष्ट्र सैनिकांचं, निर्णयाबददल महाराष्ट्र सरकारचही अभिनंदन : राज ठाकरे - पुढारी

'मराठी पाटया'चे श्रेय फक्त आणि फक्त महाराष्ट्र सैनिकांचं, निर्णयाबददल महाराष्ट्र सरकारचही अभिनंदन : राज ठाकरे

मुंबई, पुढारी ऑनलाईन : राज्यातील सर्व दुकानांवरील पाट्या ह्या मराठी भाषेतच असव्यात, असा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. पण, त्याचे श्रेय इतरांनी लाटू नये, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करून सांगितले की, “हे श्रेय फक्त आणि फक्त महाराष्ट्र सैनिकांचं आहे. इतरांची त्यांचं श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये”, असे बोल राज ठाकरे यांनी सुनावले आहेत. (मराठी नामफलक)

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.”

“काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच. आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन”, असंही राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हंटलेलं आहे. (मराठी नामफलक)

“सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा. ह्यात आणखी एक भानगड सरकारनं करून ठेवली आहे की, मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका!”, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

पहा व्हिडिओ : स्वराज्याच्या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ । जिजाऊ जयंती विशेष

Back to top button