योगींच्या मंत्रिमंडळातून काल राजीनामा दिलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात आज अटक वॉरंट! | पुढारी

योगींच्या मंत्रिमंडळातून काल राजीनामा दिलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात आज अटक वॉरंट!

लखनऊ; पुढारी ऑनलाईन

युपी (UP) सरकारमधील माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात धार्मिक भावना भडविण्याच्या प्रकरणात अटक वाॅरंट निघाला आहे. कोर्टाने २४ जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. मौर्य यांनी बसपामध्ये असताना देवी-देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. प्रकरणावर २४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. हा आदेश २०१६ मध्ये उच्च न्यायालयाकडून देण्यात आला होता तेव्हा त्यांनी या आदेशावर स्टे ऑर्डर घेतलेला होता.

उत्तर प्रदेश (UP) विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्‍का देत कामगार मंत्री स्‍वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला असून त्‍यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपचे आमदार रोशन लल, भगवती सागर आणि बृजेश प्रजापति यांनीही राजीनामा दिला असून. मौर्य यांचे समर्थक आमदार राजीनामा देऊन समाजवादी पार्टीत प्रवेश करतील, असे मानले जात आहे.

राजीनामा दिल्‍यानंतर माध्‍यमांशी संवाद साधताना स्‍वामी प्रसाद मौर्य यांनी सांगितले की, माझे व्‍यक्‍तिगत कोणीशीही शत्रुत्‍व नाही. सामाजिक न्‍यायासाठी मी सातत्‍याने संघर्ष केला आहे. यापुढेही करत राहणार आहे. सध्‍या तरी उत्तर प्रदेशमध्‍ये सामाजिक न्‍याय मिळताना दिसत नाही. त्‍यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनामा दिल्‍यानंतर मौर्य यांनी याची माहिती सोशल मीडियावरही दिली. त्‍यांनी फेसबुक पोस्‍टमध्‍ये नमूद केलं आहे की, उत्तर प्रदेशमधील दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार तरुण आणि लघू व मध्‍यम उद्‍योजक उपेक्षित राहिले आहेत. त्‍यामुळे मी योगी मंत्रीमंडळातून राजीनामा देत आहे. आणखी १० ते १२ आमदार राजीनामा देतील. पुढील एक ते दोन दिवसांमध्‍ये पुढील रणनीती स्‍पष्‍ट करण्‍यात येईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हे वाचलंत का?

Back to top button