

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
चांदवड तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अन कंत्राटी ग्रामसेवकास तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. जिल्हयातील उत्कृष्ट ग्रामसेवकांचा सत्काराच्या दुसऱ्याच दिवशी कंत्राटी ग्रामसेवकास लाच घेताना अटक झाल्याने ग्रामसेवकांच्या आनंदावर या कारवाईमुळे विरजण पडल्याने नाराजीचा सूर बघावयास मिळाला.
तक्रारदार यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये बोराळे ग्रामपंचायतीचे लोखंडी जिण्याचे काम ५० हजार रुपयास घेतले होते. सदर कामाचे उर्वरित २० हजार रुपये स्वतःच्या किंवा मुलाच्या खात्यावर जमा करण्यासाठी बोराळे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच बाकेराव जाधव (५०) व कंत्राटी ग्रामसेवक आतिश अभिमान शेवाळे (२८) यांनी १५ रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. यामुळे तक्रारदार याने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घाटगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील, पोलीस नाईक शरद हेंबाडे, राजेंद्र गीते व परशराम जाधव यांनी मंगळवारी (दि.९) बोराळे ग्रामपंचायतीच्या आवारात सापळा रचला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून कंत्राटी ग्रामसेवक शेवाळे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
दोघांवर निलंबनाची टांगती तलवार
बोराळे ग्रामपंचायतीचे सरपंच बाकेराव जाधव यांची जानेवारी २०२३ मध्ये घेतलेल्या निवडणुकीत थेट सरपंचपदी निवड झाली आहे. त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे त्यांचे सरपंचपद धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे कंत्राटी ग्रामसेवक आतिश शेवाळे हे वडिलांच्या जागेवर अनुकंपावर नोव्हेंबर २०२० साली कामावर लागले आहेत. त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असल्याची चर्चा चांदवड पंचायत समितीच्या आवारात अधिकारी, कर्मचारी करीत होते.
हेही वाचा :