बेळगाव : परगावच्या मतदारांना आणण्यासाठी ‘फिल्डिंग’ | पुढारी

बेळगाव : परगावच्या मतदारांना आणण्यासाठी ‘फिल्डिंग’

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा निवडणुकीत बुधवारी मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. नोकरी, शिक्षणानिमित्त परगावी गेलेल्या मतदारांना आणण्याची लगबग सुरू झाली आहे. गावागावातील कार्यकर्त्यांकडून परगावच्या मतदारांना आणण्यासाठी ‘फिल्डिंग’लावली जात आहे.

प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी यादीतील एकेक नाव ट्रॅक करणे सुरू केले आहे. एखाद्या घरातून लग्न होऊन परगावी केलेल्या विवाहितांना मतदानासाठी आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कुठल्याही परिस्थितीत बुधवारी सायंकाळपर्यंत मतदार मतदान केंद्रापर्यंत कसे पोचतील यासाठी स्वतंत्र टीम कार्यान्वित झाल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातून बंगळूर, मुंबई, पुणे, गोवा, हैदराबाद येथे नोकरी, शिक्षणानिमित्त गेलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या मतदारांना आणण्यासाठी खासगी गाड्या, बसची व्यवस्थाही राजकीय पक्षांनी केली आहे. संबंधित गावातील प्रमुखांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे. म. ए. समिती, भाजप, काँग्रेस, निजद व अपक्षांनी यात आघाडी घेतली आहे. मंगळवारी पुणे, मुंबई, कोल्हापूर, गोवा येथून मतदार आणण्यासाठी कार्यकर्ते नियोजनात व्यस्त होते. याशिवाय गेल्या वर्षभरात विवाह होऊन परगावी गेलेल्या मुलींना आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Back to top button