कर्नाटक विधानसभा निवडणूक : चला, निर्भयपणे मतदान करूया! | पुढारी

कर्नाटक विधानसभा निवडणूक : चला, निर्भयपणे मतदान करूया!

विधीमंडळ हे लोकशाहीचे मंदिर मानले जाते. या मंदिरात आता आपले प्रतिनिधी पाठवून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गेल्या महिनाभरातील प्रचार पाहता याही निवडणुकीत पैशांचा पाऊस पडला. निवडणूक आयोग कितीही दक्ष राहिले, तरी छुप्या मार्गाने मते खरेदी करण्याचा मोठा प्रयत्न झाला आहे. अगदी ईव्हीएमचे बटण दाबेपर्यंत आमिषांची पेरणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार राजाने खरेदी करणार्‍यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आणि स्वाभिमानाने मतदान करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक संदेश फिरत होता. जनावरांची किंमत आणि माणसाच्या मताची किंमत त्यामध्ये नमूद करण्यात आली होती. हजार, पाचशेला मते खरेदी करून मतदारांना मिंध्यात ठेवण्याचा कावा ओळखून पैशाच्या जोरावर राजकारण करणार्‍या नेत्यांना बाजूला सारण्याची वेळ आली आहे. लोक मतदानातून आपला प्रतिनिधी निवडत असतात. त्यांनी लोकांच्या समस्या दूर कराव्यात; लोकांची भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी-संवर्धनासाठी काम करावे, विकासकामे राबवून मतदार संघ आदर्श बनवावा, अशी अपेक्षा असते. पण, जर मतदारांनी पैसे घेऊन मते दिली तर निवडून येणारा उमेदवार लोकांच्या समस्या कधीच सोडवणार नाही. लोकांना दिलेल्या पाचशे रुपयांतून पाच हजार कसे मिळतील, याचाच विचार करणार. त्यामुळे मतदाराने वेळीच साधव होणे आवश्यक आहे.

सीमाभागातील मतदारसंघ हे मराठी भाषिकांची संख्या अधिक असलेले आहेत. मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेत सरकारी कागदपत्रे मिळणे, हा घटनात्मक अधिकार आहे आणि उच्च न्यायालयानेही तसा आदेश दिला आहे. पण, सरकार आणि प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सीमाभागातील मराठीपण जपण्यासाठी पुढाकार घेणारा उमेदवारच मराठी लोकांच्या समस्या मार्गी लावू शकतो. सरकार आणि प्रशासनाला जाब विचारू शकतो. त्यामुळे केवळ पैशांच्या जोरावर मते घेण्याचा प्रयत्न करणार्‍यांना जाणीवपूर्वक दूर ठेवणे मराठीच्या हिताचे असणार आहे.

स्मार्ट सिटी योजनेत बेळगावची निवड झाली. अनेक रस्ते, गटारी कामे झाली. पण, नियोजनशून्य कामे असल्यामुळे अर्धा तास पाऊस पडला तरी शहरात पाणी तुंबून राहते. शहरातील निम्म्या घरांत पाणी शिरते. त्यामुळे सुशोभिकरण आणि सुशोभित विज खांब बसवून लोकांच्या समस्या सुटणार नाहीत. तर विकासाला मिळणारा निधी चांगल्या पद्धतीने खर्च झाला पाहिजे, याचे नियोजन करणारा उमेदवार विजयी होणे आवश्यक आहे.

पाच वर्षे महत्त्वाचा काळ

मतदान करताना प्रत्येकाने येणार्‍या पाच वर्षांचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पाच वर्षे खूप महत्वाची असतात. आता जर निर्णय चुकला तर पाच वर्षे काहीही करता येत नाही. भारतीय लोकशाहीत उमेदवार निवडण्याचा अधिकार मतदारांना आहे. त्यांना माघारी बोलावण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आपले मत योग्य ठिकाणीच पडेल, याचा सारासार विचार होणे आवश्यक आहे.

Back to top button