

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आर्कि. अमृता पवार मंगळवारी (दि. १४) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे निफाड तालुक्यातील राजकीय गणिते वेगाने बदलण्याची शक्यता आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या देवगाव गटातून त्या सदस्य म्हणून निवडून गेल्या होत्या.
माजी लोकसभा सदस्य कै. वसंत पवार यांचा राजकीय वारसा अमृता पवार यांनी पुढे चालविला असून, जि.प.च्या माध्यमातून दबदबा तयार केला आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेत कै. पवार यांची एकहाती सत्ता होती. कै. पवार यांच्या निधनानंतर संस्थेच्या सदस्यांनी अमृता पवार यांना जि.प.च्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्यासाठी मदत केली, तर कै. पवार यांच्या पत्नी नीलिमा पवार यांच्याकडे संस्थेची धुरा दिली होती. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पदाधिकारी आणि संचालक मंडळ यांच्या निवडणुकीत नीलिमा पवार यांना पराभवाचा फटका बसला होता. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नीलिमा पवार यांचे प्रतिस्पर्धी ॲड. नितीन ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिल्याची जोरदार चर्चा होती. निवडणुकीनंतर मविप्र सरचिटणीस ॲड. ठाकरे यांच्यासह संचालक मंंडळाने खा. पवार यांची मुंबईत जाऊन भेट घेतली होती. तसेच ॲड. ठाकरे यांचे पुतणे युवराज ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून महापालिकेसाठी तयारी करीत आहेत. आर्कि. अमृता पवार यांना भारतीय जनता पक्षात नवी इनिंग सुरू करताना वडील कै. वसंत पवार आणि आजोबा कै. शंकरराव कोल्हे यांच्या जनसंपर्काचा फायदा होणार आहे. त्यासोबतच जि.प.च्या देवगाव गटातील कार्यकर्त्यांची फळी त्यांच्यामागे आहे. त्यामुळे आर्कि. पवार यांच्या प्रवेशाचा भाजपलाही फायदा होणार आहे. याबाबत आर्कि. पवार यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, प्रवेश झाल्यानंतर माहिती देण्याबाबत त्यांनी सांगितले आहे.
येवला मतदारसंघासाठी होऊ शकतो विचार
येवला मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे कायमच राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. येत्या काळात अनेक राजकीय समीकरणे बदलली जाण्याची शक्यता लक्षात घेत हा मतदारसंघ मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार तयारी केली जाणार आहे. त्यात आर्कि. पवार यांचा जनसंपर्क, मविप्रच्या माध्यमातून बांधलेली कार्यकर्त्यांची फळी आणि कोपरगावमधील माजी मंत्री कै. कोल्हेंची नात या निकषांच्या जोरावर भुजबळांना शह देण्यासाठी विचार केला जाऊ शकतो.