

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील गारपीट व अवकाळी पावसामुळे जबरी नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल. आपण स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या अडीअडचणींची पूर्ण जाणीव आहे. बाधित शेतकऱ्यांना भरीव अनुदान दिले जाईल, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनास दिले. मंगळवारी (दि.११) मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेत राज्यभरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीचा निर्णय जाहीर करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे सोमवारी (दि.१०) बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांच्या पाहणीसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री ना. दादा भुसे, आमदार दिलीप बोरसे व अधिकारीवर्ग उपस्थित होते. अयोध्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांचा बागलाण दौरा अचानक ठरला. सोमवारी (दि.१०) याबाबत प्रशासनास माहिती मिळताच शासकीय यंत्रणेची एकच धावपळ उडाली. मुख्यमंत्र्यांसाठी ढोलबारे येथे तातडीने हेलिपॅड उभारण्यात आला. दुपारी पावणेतीनला मुख्यमंत्र्यांचे हेलिपॅडवर आगमन झाले. तेथून करंजाड, निताणे, बिजोटे व आखतवाडे येथील शिवारात जाऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
निताणे येथील मुरलीधर पवार यांच्या शेतात मुख्यमंत्र्यांनी गारपीट झालेल्या कांदा पिकाची पाहणी केली. तेथून जवळच असलेल्या द्राक्षबागेत तसेच डाळिंब बागेत जात बाधित शेतकऱ्यांकडून नुकसानीबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यानंतर बिजोटे येथील चंद्रभान बच्छाव यांच्या शेतात जाऊन पाहणी करीत माहिती घेण्यात आली. दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात आखतवाडे येथे शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, कर्जमाफी योजनेंतर्गत प्रतिशेतकरी ५० हजार रुपये अनुदान देण्याबाबतही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे. यापूर्वीची अडीच एकरांची अट शिथिल करून तीन एकरांपर्यंतच्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यासाठी प्रचलित नियम बाजूला ठेवून मदत करण्याचे धोरण स्वीकारले जाईल. बागलाण तालुक्यात अर्ली द्राक्ष उत्पादन घेतले जाते. त्यासाठी प्लास्टिक आच्छादनाची योजना शासनाने आणली असून, सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत भरपाई देण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने निर्णय घेतला होता. त्यासाठी १७७ कोटी रुपये तत्काळ वर्ग करण्याच्या प्रशासनास सूचना दिली आहे. बागलाणसह राज्यभरात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मदत करण्यासाठी मंगळवारी (दि.११) तातडीची मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात येईल व भरीव मदतीबाबतचा निर्णय तत्काळ घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी पालकमंत्री ना. दादा भुसे व आमदार दिलीप बोरसे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर कैफियत मांडली. माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय कृषी संचालक मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे आदींसह शासकीय विभागांचे अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.
प्रभू रामचंद्रांकडेही केली प्रार्थना
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना अयोध्या दौऱ्यादरम्यान प्रभू रामचंद्राचे दर्शन घेताना राज्यभरातील शेतकऱ्यांवरील संकट टळावे आणि शेतकऱ्यांची आणि महाराष्ट्राची भरभराट व्हावी, अशीच प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
हारतुरे नाकारले
विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी हारतुरे, गुच्छ आणून स्वागत करण्याचे ठरविले होते. परंतु शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली असताना सत्कार स्वीकारणे गैर असून, ते आपल्याला शोभनीय नाही, असे सांगून शिंदे यांनी हारतुरे नाकारले.
बागलाणवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या
बागलाण तालुक्याला गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अवकाळी आणि गारपीटचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत असून, नुकसान होताच तत्काळ दोनच दिवसांत थेट मुख्यमंत्री तालुक्याच्या दौऱ्यावर आले. मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा थेट बांधावर पोहोचल्याने बागलाणवासीयांच्या नुकसान भरपाईबाबतच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
हेही वाचा :