बारामती : गौणखनिज उत्खननावर कारवाईची प्रतीक्षा; महसूल विभागाकडून वेळकाढूपणा | पुढारी

बारामती : गौणखनिज उत्खननावर कारवाईची प्रतीक्षा; महसूल विभागाकडून वेळकाढूपणा

बारामती; पुढारी वृत्तसेवा : साबळेवाडी (ता. बारामती) हद्दीतून बड्या ठेकेदाराने 11 हजार ब्रासपेक्षा अधिक मुरूम शासकीय परवानगीशिवाय काढला आहे. यासंबंधी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुराव्यानिशी महसूल विभागाकडे तक्रारी दिल्या होत्या. परंतु, दोन महिन्यांनंतरही ठेकेदारावर कारवाई झालेली नाही. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या जवळचा हा ठेकेदार असल्याने हा विभाग कारवाईबाबत वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप केला जात आहे. ठेकेदाराने दोन शेतक-यांच्या शेतातून बेसुमार मुरूम उपसा केला.

अंगलट आल्यावर शेततळे उभारणीसाठी खोदाई केली असे सांगण्यास शेतकर्‍यांना सांगितले. परंतु शेततळ्यासाठीही या शेतकर्‍यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. तसेच या ठेकेदाराशी खोदाईचा करारही केलेला नव्हता. त्यामुळे संबंधित शेतक-यांच्या सात-बारावर गौणखनिज उत्खननाचा बोजा टाकावा, अशी मागणी तक्रारदार पोपट धवडे यांनी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतही धाव घेतली, तरीही कारवाई झालेली नाही.

गौणखनिज उत्खनन झालेल्या ठिकाणी महसूल विभागाला जेसीबी, पोकलेनसारख्या मशिनरी, मोबाईल, वाहने, क्रशर मिळून आली. ती अद्याप जप्त केली नाहीत. तलाठी, मंडल अधिकार्‍यांनी अद्याप याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला नोटीसही बजावली नाही. परिसरात संबंधिताने 11 हजार ब्रासचे उत्खनन केले आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला आहे.

उत्खननासाठी साबळेवाडी ग्रामपंचायतीचीही कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तलाठ्यांनी 3 फेब्रुवारी रोजी पंचनामा करून तो तहसीलदारांकडे सादर केला. तहसीलदारांना याप्रकरणी दंडाचे अधिकार आहेत. तरीही अद्याप दंड केलेला नाही. ठेकेदाराशी मिलीभगत केल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

थेट महसूलमंत्र्यांची भेट घेणार
जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे तक्रारदाराने वारंवार हेलपाटे मारल्यानंतरही या प्रकरणात महसूल विभाग बोटचेपी भूमिका घेत आहे. त्यामुळे याप्रश्नी आता थेट महसूलमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित दोषी अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे धवडे यांनी सांगितले.

Back to top button