पुणे : आनंदाचा शिधा योजनेचे नियोजन फसले ! | पुढारी

पुणे : आनंदाचा शिधा योजनेचे नियोजन फसले !

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘आनंदाचा शिधा’ योजनेतील साखर आणि हरभरा डाळ वेळेत मिळाली. परंतु, रवा आणि पामतेलचा पुरवठा कंत्राटदार वेळेवर करू शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिधा संच वाटपाचे नियोजन पूर्णतः फसले आहे. जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यांमध्ये सोमवारी दुपारी चारपर्यंत सुमारे 54 टक्के लाभार्थ्यांना संच वितरित करण्यात आले, तर उर्वरित 44 टक्के लाभार्थ्यांचे शिधा संच दुकानातच आहेत.

राज्य शासनाने दिवाळीच्या धर्तीवर गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. परंतु दिवाळीप्रमाणेच गुढीपाडव्यालाही शिधा संच वितरणाचे नियोजन फसले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच लाख 61 हजार 593 कुटुंबांना शिधा संच वाटप केले जाणार आहे.

आवश्यक शिधा संच स्वस्त धान्य दुकानात पोहोचल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु सोमवारी (दि.10) दुपारी चारपर्यंत तीन लाख 10 हजार 319 शिधापत्रिकाधारकांनीच शिधा संच खरेदी केले. तर उर्वरित दोन लाख 19 हजार 274 शिधापत्रिकांचे शिधा संच स्वस्त धान्य दुकानातच पडून आहेत. अवघ्या तीन दिवसांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आली असून, लाभार्थ्यांना शिधा संच मिळण्याची शक्यता कमीच आहे.

शहरात साडेनऊ हजार जणांना लाभ
पुणे-पिंपरी चिंचवड शहरांत तीन लाख 30 हजार 811 अंत्योदय आणि प्राधान्य शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना ‘आनंदाचा शिधा’ संच शंभर रुपयांत दिला जात आहे. मात्र, सोमवारी चार वाजेपर्यंत दोन्ही शहरांत केवळ 9 हजार 431 शिधापत्रिकाधारकांनीच संच नेले आहेत. तर अजूनही तीन लाख 21 हजार 380 जणांना ते मिळालेले नाहीत.

घोषणा दोन संचांची; मिळणार एकच
गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मात्र, यात दोन्ही
सणोत्सवाचा उल्लेख केला असला, तरी प्रत्यक्षात एकच संच दिला जाणार आहे. त्यामुळे सरकारने लाभार्थ्यांचा डबल गेम केल्याची चर्चा होत आहे.

Back to top button