

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपुरात महिला शिपायाने प्रेमिका (गर्लफ्रेण्ड) बनून चोराला पकडण्यात यश मिळविले. एका घरफोड्याला पकडण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी चाेरट्याची कमजोरी ओळखून एका महिला पोलीस शिपायाने घरफोड्याशी संपर्क साधला. त्याच्याशी प्रेमाच्या गोष्टी केल्या. नंतर त्याला भेटायला बोलावले. घरफोड्या येताच त्याला अटक केली. सोबत दोन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर येथील संजय रतनकुमार चौधरी (वय ५३) यांच्या कंपनीतून आरोपींनी लाखोंच्या मालाची चोरी केली. आरोपी अंकेश ऊर्फ टोबो रामसिंह पाल व त्याच्या सहकाऱ्यांनी ही चोरी केल्याचा पाेलिसांना संशय हाेता. त्याच्या मागावर पोलीस होते. पोलिसांनी त्याची गुप्त माहिती काढली असता आरोपी टोबो त्याच्या दोन गर्लफ्रेण्डसोबत तासनतास बोलत असल्याची माहिती मिळाली. त्याची ही कमजोरी समजताच एमआयडीसी पोलिसांनी वेश बदलून सापळा रचला.
एका महिला पोलीस शिपायाने त्याच्याशी संपर्क साधून त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. आपल्या जाळ्यात नवी प्रेमिका फसल्याचे टोबोला वाटले. त्यानंतर अनेकवेळा टोबोने फोन केल्यानंतर प्रेमिका झालेल्या महिला शिपायाने त्याला लोकमान्यनगर मेट्रो स्थानकावर भेटायला बोलावले. टोबो तिथे पोहोचला व त्याने महिला शिपायाशी बोलणे सुरू ठेवले. तिथे साध्या वेशात फिरत असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्यासोबत दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले. त्याच्या जवळून ९६ हजाराचा माल जप्त केला आहे.
हेही वाचलंत का ?