

थोर विचारवंत, लेखिका दुर्गा भागवत यांनी बराच काळ या निळावंतीच्या कथेचा आणि पुस्तकाचा शोध घेतल्याचं सांगितलं आहे. वास्तविक, 'निळावंती' हा ग्रंथ नसून, एक पोथी आहे. निळावंती ही अत्यंत सुंदर तरुणी सह्याद्रीच्या जंगलात राहत असे. तिला पशू-पक्ष्यांची भाषा अवगत होती. एका पुरुषानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केलं. तिच्याकडून पशू-पक्ष्यांची भाषा शिकून घेतली. नंतर तिच्या माध्यमातून अपार धन मिळवून नंतर तिची हत्या केली, अशीही दंतकथा आहे. (mystery of nilavanti granth)
जे सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करतील, ज्याच्यातून राजद्रोहाचा प्रसार केला जातो असा संशय आहे, अशी किती तरी पुस्तकं ब्रिटिशांनी त्यांच्या काळात जप्त केली. अगदी लोकमान्य टिळकांचा 'गीतारहस्य' हा ग्रंथही ब्रिटिशांनी संशयावरून राजर्षी शाहू महाराजांकरवी मागवून घेतला होता. त्यात काही 'राजद्रोह' नाही, हे आढळून आल्यावर त्यांनी तो जप्त न करता परत केला. तथापि, असा एक ग्रंथ ब्रिटिशांनी 1935 मध्ये जप्त केला आणि त्यावर बंदी आणली, ज्याचा राजद्रोहाशी सूतराम संबंध नव्हता; मग त्यांनी त्या ग्रंथावर बंदी का आणली? कारण ते एक वेगळंच, शेकडो वर्षं गूढतेचं वलय असणारं प्रकरण आहे. हा ग्रंथ आहे 'निळावंती!'
असं सांगितलं जातं की, 'निळावंती' हा ग्रंथ भास्कर भट्ट नावाच्या लेखकानं सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिला. हा ग्रंथ भास्कराचार्य यांनी लिहिला, असंही काही लोक म्हणतात; पण त्यात काही तथ्य नाही; कारण भास्कराचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे, 'लीलावती.' 'लीलावती' हा गणितशास्त्राविषयाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचा आणि 'निळावंती'चा एकमेकांशी दुरान्वयानेही संबंध नाही. 'निळावंती' हा सर्वस्वी वेळा ग्रंथ आहे. हा ग्रंथ ब्रिटिश राजसत्तेच्या विरोधात लोकांना चिथावणी देत होता का? लोकांना सरकारविरुद्ध भडकावत होता का? तर नाही. मुळीच नाही. तरीही ब्रिटिशांनी त्याच्यावर बंदी घातली. याचे कारण असे की, हा ग्रंथ काळ्या जादूसाठी उपयोगात आणला जातो, असा सरकारला संशय होता. हा एक ग्रंथच नव्हे, तर 'निळावंती' नावाच्या ज्या ज्या गोष्टी समाजात मिळत होत्या, दिसत होत्या, त्या सगळ्यांवरच ब्रिटिशांनी बंदी आणली.
'निळावंती' हा ग्रंथ वाचल्यानंतर वाचणार्याला मृत्यू येतो किंवा त्याला वेड लागते, अशी द़ृढ समजूत समाजात होती आणि अजूनही आहे. काही पशू- पक्ष्यांना जमिनीत पुरलेलं गुप्तधन दिसतं, अशी एक अंधश्रद्धा समाजात पसरलेली होती; पण पशू-पक्ष्यांना जे गुप्तधन दिसतं, ते माणसाला कसं समजणार? तर 'निळावंती' हा ग्रंथ वाचल्यानंतर माणसाला पशू- पक्ष्यांची भाषा समजते आणि मग ते पशू-पक्षी आपली भाषा जाणणार्या माणसाला गुप्तधनाची जागा सांगतो, अशी अंधश्रद्धा होती. जर आजच्या काळातही अनिष्ट समजुती पसरत असतील आणि त्यातून हत्याकांडे घडत असतील, तर गेल्या शतकात त्यांचा पगडा समाजमनावर किती असेल, याचा अंदाज आपण बांधू शकतो.
त्यामुळे, 'निळावंती' हा ग्रंथ वाचल्यावर पशू- पक्षी त्यांना माहीत असलेली जागा माणसाला दाखवतात, अशी समजूत त्या काळात पसरलेली असणं शक्य आहे! 'निळावंती' हा ग्रंथ दिवसा सूर्यप्रकाशात धरून किंवा रात्री समईच्या किंवा दिव्याच्या उजेडात धरून वाचायचा नाही; नैसर्गिक किंवा अन्य कृत्रिम उजेडातही नाही; मग तो कसल्या उजेडात वाचायचा? हे समजलं तर अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण, अशी साधना करायची झाली, तर कष्टही तसेच घ्यायला हवेत, असं सांगितलं जायचं. गर्भवती स्त्रीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या चितेला अग्नी द्यायचा. त्या चितेच्या ज्वाळांच्या प्रकाशात धरून हा ग्रंथ वाचायचा, ही चिता विझण्याच्या आधी हा ग्रंथ वाचून पूर्ण झाला पाहिजे, अशी एक अतिशय अनिष्ट आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी समजूतही त्याकाळी प्रचलित होती.
योग्य औषधोपचाराच्या अभावी अनेक गर्भवती स्त्रियांचा मृत्यू तेव्हा ओढवतही असे; पण असा मृत्यू आपोआप झाला नाही, तर 'निळावंती' वाचण्यासाठी प्रकाश हवा म्हणून गर्भवती महिलेची हत्या करणारे नराधमही समाजात असू शकतात. चितेच्या ज्वाळांचा उजेड उपलब्ध असेपर्यंत हा ग्रंथ वाचून पूर्ण झाला, तर पशू-पक्ष्यांच्या भाषेबरोबरच चौर्याऐंशी लक्ष योनींच्या भाषेवर माणूस प्रभुत्व मिळवू शकतो, अशीही समजूत पसरलेली होती. 'निळावंती' वाचत असताना त्या वाचनापासून परावृत्त करण्यासाठी अनेक अघोरी शक्ती साधकाला भीती दाखवण्यासाठी त्याच्या जवळ येतात. त्यांना न भीता हे पुस्तक वाचून पूर्ण करावे लागते. हा ग्रंथ वाचला जात असताना घरातून बाहेर पडणारी निळावंती एकेका प्राण्याशी आणि पक्ष्याशी बोलत जाते. प्रत्येक प्राण्याची आणि पक्ष्याची कथा वाचत असताना तो तो प्राणी आणि पक्षी साधकाच्या जवळ येतो व त्या पशू- पक्ष्याची भाषा त्याला समजायला लागते, अशी अंधश्रद्धा होती.
'निळावंती' आता उपलब्ध आहे का? हा प्रश्न निर्माण होतो; पण तो मूळ ग्रंथ उपलब्ध आहे का? हा प्रश्न अनुत्तरित आहे; पण काही आख्यानांमधून निळावंतीच्या कथेचा सारांश सांगितला जायचा. पहाटेच्या वेळी दारात येणारा पिंगळा एकेकाळी निळावंतीचा उल्लेख करत असे. तसेच काही लोककथांमधून निळावंतीची कथा कर्णोपकर्णी पसरलेली होती.
थोर विचारवंत, लेखिका दुर्गा भागवत यांनी बराच काळ या निळावंतीच्या कथेचा आणि पुस्तकाचा शोध घेतल्याचं सांगितलं आहे. दुर्गा भागवत आपल्या 'प्रासंगिका'नामक पुस्तकात निळावंतीचा उल्लेख करतात. स्वामी विवेकानंदांनी 'निळावंती'चं वाचन केलं होतं, म्हणूनच त्यांना अकाली मरण आल्याची अफवा त्यांनी ऐकली होती. वास्तविक, 'निळावंती' हा ग्रंथ नसून, एक पोथी आहे. चारशे वर्षांपूर्वी निळावंती ही अत्यंत सुंदर तरुणी सह्याद्रीच्या जंगलात राहत असे. तिला पशू-पक्ष्यांची भाषा अवगत होती. एका पुरुषानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केलं. तिच्याकडून पशू-पक्ष्यांची भाषा शिकून घेतली. नंतर तिच्या माध्यमातून अपार धन मिळवून नंतर तिची हत्या केली, अशीही दंतकथा आहे. निळावंती आणि तिचा प्रियकर यांची प्रेमकथा खेडोपाड्यात अजून सांगितली जाते. ही निळावंती अजूनही जंगलात अस्तित्वात आहे, अशी दंतकथा आहे. हा विषय घेऊन अलीकडेच एक कादंबरी लिहिली गेली आहे.
हेही वाचा