

पुढारी ऑनलाईन: मेघालय आणि नागालॅंड या ईशान्येकडील दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज सोमवारी (दि.२७) मतदान होत आहे. मेघालय आणि नागालँडमधील ११८ जागांसाठी ५५० हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या 60-60 जागा आहेत, परंतु यावेळी मेघालय आणि नागालँडमध्ये 59-59 जागांसाठी मतदान होत आहे.( Meghalaya Nagaland Elections 202 )
दरम्यान, मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी २१ लाखांहून अधिक मतदार सोमवारी(दि.२७) ३६९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. राज्यातील ५९ विधानसभा मतदारसंघांसाठी ३४९१ मतदान केद्रांवर मतदान होणार आहे. सोमवारी (दि.२७) सकाळी ७ वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे. सत्तेत पुन्हा परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) यावेळी सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो. दुर्गम आणि डोंगराळ भागात पायाभूत सुविधांचा अभाव हा यावेळच्या निवडणुकीतील प्रमुख मुद्दा आहे. याशिवाय भ्रष्टाचाराचे आरोपही एनपीपी सरकारसाठी मोठी समस्या बनले आहेत. याशिवाय जैंतिया आणि खासी हिल्समधील बेकायदेशीर कोळसा खाणीचा प्रश्नही निवडणुकीवर परिणाम करू शकतो.
मेघालय भाजपचे प्रमुख अर्नेस्ट मॉरी यांनी सांगितले की, मेघालय हे ख्रिश्चन बहुसंख्य राज्य आहे आणि भाजप सत्तेत आल्यास ख्रिश्चनांना अधिक संरक्षण देईल. जर भाजप राज्यात सत्तेवर आला तर ते गोमांस खाणाऱ्या लोकांवर कोणतीही बंदी घालणार नाहीत, असे भाजपने स्पष्ट केले आहे.