नागपूर : पुढारी वृत्तसेवा – नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे दिसल्यानंतर शिवसेनेने आपला उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. आता काँग्रेसचे समर्थन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना की शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना याचा फैसला आज होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने सायंकाळपर्यंत या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. उद्धव ठाकरे गटाला नागपुरातून माघार घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांच्यादेखील माघारीचे संकेत आहेत. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील राजकारणामुळे महाविकास आघाडीवर उमेदवारांमध्ये अदलाबदल करण्याची वेळ आली.
सुरुवातीला नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार न उतरविण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांच्यासाठी सोडण्यात आली. मात्र, त्यामुळे नागपुरात काँग्रसमध्ये असंतोष निर्माण झाला. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, काँग्रेसप्रणित शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरचे प्रवक्ते सतीश इटकेलवार यांनीही अर्ज दाखल केला.
दुसरीकडे, नाशिक पदवीधर मतदारसंघात ऐनवेळी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. आता तेथे काँग्रेसऐवजी शिवसेना ठाकरे गट समर्थित शुभांगी पाटील या उमेदवार आहेत. त्यामुळे आता नागपूरची जागा पुन्हा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय होणार असून काँग्रेसप्रणित शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले हे उमेदवार राहतील, असे संकेत आहेत. दरम्यान, नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार आणि नाशिकमध्ये सेनेचे समर्थन मिळालेल्या शुभांगी पाटील यांचे फोन माघारीला काही वेळ शिल्लक असताना नॉट रिचेबल असल्याने नवा ट्विस्ट आला आहे.
हेही वाचा :