

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या माजी मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकास गाडगेनगर पोलिसांनी मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. कैलाश गणेश सूर्यवंशी (२३, रा. शेंबाळपिंप्री, ता. पुसद, यवतमाळ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका मांडणाऱ्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांना ३० जुलै रोजी ट्वीटर हॅण्डलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कैलाश सूर्यवंशी नावाच्या ट्विटर हॅन्डलवरून ही धमकी देण्यात आली.
या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड यांनी सोमवार, ३१ जुलै रोजी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, मंगळवारी आरोपीला पोलीसांनी अटक केली. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
-हेही वाचा