कोल्हापूर : दुरुस्तीमुळे गरुड मंडपात गणेशमूर्ती प्रतिष्ठापना नाही | पुढारी

कोल्हापूर : दुरुस्तीमुळे गरुड मंडपात गणेशमूर्ती प्रतिष्ठापना नाही

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपामध्ये महालक्ष्मी भक्त मंडळाच्या वतीने गणेश चतुर्थीवेळी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. सध्या गरुड मंडपाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, येथील लाकडी खांब धोकादायक बनलेले आहेत. यामुळे येथे गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महालक्ष्मी भक्त मंडळाने केलेल्या पत्रव्यवहारावरही देवस्थान समितीकडून उत्तर न आल्याने गणेशमूर्तीसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे.

गणेशोत्सवासोबत गरुड मंडपात साजर्‍या होणार्‍या वेगवेगळ्या उत्सवांच्या अनुषंगाने महालक्ष्मी भक्त मंडळाने देवस्थान समितीकडे परवानगी मागितली होती. 6 सप्टेंबरपासून कृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा होतो. यानंतर येथे आरास करून गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेची तयारी केली जाते. यासाठी भक्त मंडळाने परवानगीचे पत्र देवस्थान समितीला पाठवले होते. गरुड मंडपातील गणेशोत्सवाची 47 वर्षांची परंपरा खंडित होऊ नये, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती.

गरुड मंडपातील लाकडी खांब बदलण्यात येणार असून, मागील आठ महिन्यांपासून हा मंडप बंद आहे. मंडपासाठी कर्नाटकातून लाकूड खरेदीची प्रक्रियाही पूर्ण झाली असून, पावसाळा संपल्यानंतर हे काम सुरू होणार असल्याचे समजते. गणेशोत्सवापर्यंत हे काम पूर्ण न झाल्यास गणेशमूर्तीसाठी पर्यायी जागा शोधावी लागणार आहे.

अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपामध्ये विविध उत्सव साजरे होतात. गणेशोत्सवाचेही सर्व विधी करण्याची परंपरा आहे. यंदा मंडप दुरुस्तीचे कारण सांगण्यात आले असून, गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना कुठे करावी, हे देवस्थान समितीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. पर्यायी जागेचा शोध सुरू असला, तरी उत्सवमूर्ती मंडपामध्ये बसविण्याची आम्हाला परवानगी मिळावी.

– राजू मेवेकरी, अध्यक्ष, महालक्ष्मी भक्त मंडळ

Back to top button