प्रदेश युवक काँग्रेस हादरली; शिवानी वडेट्टीवार, अभिषेक धवडसह ४९ पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

प्रदेश युवक काँग्रेस हादरली; शिवानी वडेट्टीवार, अभिषेक धवडसह ४९ पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
Published on
Updated on

नागपूर; राजेंद्र उट्टलवार : विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघात निवडणूक आटोपताच आणि मविआ अर्थात काँग्रेसला 'अच्छे दिन' येणार असल्याचे बोलले जात असतानाच काँग्रेस हायकमांडने युवक काँग्रेसच्या नेता पूत्रासह ४९ पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ माजली आहे.

नागपूरचे जिल्हाध्यक्ष मिथिलेश कन्हेरे आणि गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम यांना निलंबित करण्यात आले आहे. अखिल भारतीय व प्रदेश युवक काँग्रेसने वेळोवेळी दिलेल्या सूचना निर्देशांचे पालन करण्यात आले नाही, संघटनात्मक जबाबदारी पार पाडली नाही असा ठपका या पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला असून दिल्लीतून या सर्वांवर नजर ठेवली जात होती, अशी माहिती प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी दिली. पक्षातर्फे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात तिकीटासाठी इच्छुक असलेल्या शिवानी वडेट्टीवार अभिषेक धवड, तनवीर विद्रोही या नेता पुत्रांचा समावेश आहे हे विशेष.

निवडणूक निकालापूर्वीच या कारवाईने युवक काँग्रेस हादरली आहे. एकप्रकारे भाजपशी वैचारिक लढाई लढताना बेशिस्त कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही हा मेसेज यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच काँग्रेसने देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच याचे चांगले की वाईट परिणाम होतात हे येणारा काळच सांगणार आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी उदय भानू व सह प्रभारी कुमार रोहित यांनी ही तडकाफडकी निलंबन व कारणे दाखवा नोटीस बजावली असून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी, माजी आमदार अशोक धवड यांचे पुत्र अभिषेक धवड, तनवीर विद्रोही, माजी नगरसेविका नेहा निकोसे या पदाधिकाऱ्यांचे काम समाधानकारक नसल्याचे म्हटले आहे.

यात सरचिटणीस अनुराग भोयर, आकाश गुजर, अक्षय हेटे, पंकज सावरकर, दुर्गेश पांडे, सागर चव्हाण, केतन रेवतकर, सौरभ श्रीरामे, हारून खान, तौसीफ अहमद, फैजल नागानी, इर्शाद शेख, नवनाथ चौधरी, इमरान पल्ला, हेमंत कातुरे आदींचा समावेश आहे. या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संघटन मजबुतीसाठी पक्षातर्फे विविध उपक्रम देण्यात आले होते. पदाधिकाऱ्यांच्या कामावर हाय कमांडकडून देखरेख ठेवली जात होती. पक्षविरोधी कार्यवाही केल्याचा ठपका ठेवत या सर्वांना आता तीन दिवसात पक्षाने उत्तर मागितले आहे. उत्तर आल्यावर या सर्वांचे निलंबन होणार का, हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news