

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : २०२३ मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी असल्याची नोंद करण्यात आली आहे. म्हणून नागपूर जिल्ह्यातील ११ महसुली मंडळांमध्ये आज (दि.४) दुष्काळ घोषीत करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार सावनेर तालुक्यातील सावनेर, पाटणसावंगी, केळवद व खापा, मौदा तालुक्यातील निमखेडा व खात, उमरेड तालुक्यातील सिर्सी, नरखेड तालुक्यातील मेंढला, रामटेक तालुक्यातील देवलापार, काटोल तालुक्यातील येनवा, कळमेश्वर तालुक्यातील मोहपा या महसुली मंडळात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या भागात उपाययोजना व सवलतींची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
जमीन, महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे, अशा उपायययोजना व सवलतींचा समावेश आहे. या विविध सवलतींचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. याअनुषंगाने संबंधित विभागांनी आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत. त्यानुसार उचित कार्यवाही करत अनुपालन अहवाल सादर करावा. ज्या नवीन स्थापन केलेल्या महसुली मंडळात पर्जन्यमापक यंत्रे बसवली नाहीत, अशा मंडळांची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज (सोमवारी) दिले आहेत.
हेही वाचा :