Crop Insurance
Crop Insurance

महत्वाची बातमी ! पीकविम्यासाठी दोन दिवसांची वाढीव मुदत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात पीक विमा योजनेंतर्गत 2023-24 मध्ये कोकणातील आंबा आणि सर्व राज्यातील काजू, संत्रा ही फळपिके व रब्बी हंगामातील ज्वारी या पिकासाठी विमा योजनेत सहभाग घेण्याचा अंतिम दि. 30 नोव्हेंबर 2023 असा असून, त्यामध्ये इच्छुक शेतकर्‍यांसाठी दि. 4 व 5 डिसेंबर अशी दोन दिवसांची वाढीव मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पीक विमा पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे काही इच्छुक शेतकरी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले आहेत. या शेतकर्‍यांना विमा योजनेत भाग घेता यावा या दृष्टिकोनातून कोकणातील आंबा पीक, सर्व राज्यांतील काजू, संत्रा या फळपिकांसाठी व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने 2 डिसेंबरच्या पत्रान्वये 4 व 5 डिसेंबर अशी दोन दिवसांची अतिरिक्त वाढीव मुदतवाढ मंजूर केली आहे.

त्यासाठी दोन दिवस पोर्टल पुन्हा उघडले जाणार असल्याचेही केंद्राच्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे राज्यातील आंबा, काजू, संत्रा व ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून पत्रकांन्वये करण्यात आले आहे.

आंब्यासाठी मुदत 31 डिसेंबरपर्यंत
कोकणाव्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भागांतील आंबा फळ पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 असा नियमित आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2023 असा असल्याचेही कृषी विभागाच्या पत्रकात नमूद केले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news