

नागपूर- लहानपासून आपण संघर्षात जगलो. कधीकाळी आई सोबत भायखळा येथील भाजीबाजारात जाताना टांग्यांच्या मागे आम्ही दोघे भाऊ धावत होतो.चाबकाचे वळ पाठीवर उमटत होते. आता तर आयुष्यभर चाबूक खाऊन पाठ कडक झाली. शेवटी सर्वांनी चाबूक मारलेत तर पाठ राठ होणारच ना ? या शब्दात अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपला संघर्ष उलगडला. विरोधकांना चिमटा काढला. नागपुरात आल्यानंतर ते विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
मला जे खाते मिळाले त्याविषयी मी नक्कीच समाधानी आहे. कुठलेही खाते द्या, 1991 पासून मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध विभागांची जबाबदारी सांभाळली. तीन वेळा उपमुख्यमंत्री होतो. 2019 साली उद्धव ठाकरे सरकारमध्ये हे अन्नपुरवठा खाते माझ्याकडे होते. आता पुन्हा एकदा ती जबाबदारी माझ्याकडे आली. शिवभोजन ही उत्तम योजना या माध्यमातून सुरू केली त्याचा नक्कीच गरजूंना फायदा झाला या शब्दात भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले.
राजी नाराजीत अनेक दिवसानंतर मंत्रीपद मिळाले. प्रथम आगमनानिमित्त त्यांचे स्वागत झाले. यावेळी ईश्वर बाळबुधे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, डिसेंबरमध्येच मंत्रीपद मिळणार होते. मात्र माझा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. धनंजय मुंडे यांच्याकडे ते खाते केले काही अडचणीमुळे ते मंत्रिमंडळापासून दूर झाल्याने आता पुन्हा माझ्याकडे आले अशा सोप्या शब्दात त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विषयी अधिक बोलणे टाळले.
शिवभोजन ही अतिशय उत्तम योजना आहे. दोन लाख रोज या माध्यमातून जेवण करतात. एका केंद्रावर दहा ते पंधरा लोक काम करतात त्यांना रोजगार आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील या माध्यमातून होते या शब्दात त्यांनी शिवभोजन योजनेचे समर्थन केले. रेशनकार्ड कमी होणारच केंद्र सरकारकडून अन्नधान्याचा ठराविक कोटा राज्य सरकारला मिळतो. अनेकदा तो गरजूंना पुरवठा करताना पुरवठा आणि उपलब्धता हे गणित जुळत नाही. त्यामुळे नेमक्या गरजूंपर्यंत हे अन्नधान्य पोहोचावे यासाठी अनावश्यक लोकांची नावे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ती कमी करावीच लागतील या शब्दात रेशन कार्ड धारकांची नावे कमी करण्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी समर्थन केले.