महात्मा फुलेंचा लढा ब्राह्मण्याविरोधात: छगन भुजबळ

चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा इतिहास समजून घ्या!
Pune News
महात्मा फुलेंचा लढा ब्राह्मण्याविरोधात: छगन भुजबळPudhari
Published on
Updated on

पुणे: ‘महात्मा फुले यांचे लेखन हे त्यावेळेच्या कर्मठ ब्राह्मणांविरोधात आहे. फुले यांचा लढा हा ब्राह्मणांविरोधात नव्हता, तर ब्राह्मण्याविरोधात होता. आपण इतिहास विसरत चाललो असून, इतिहास जाणून घेण्यासाठी ‘फुले’ चित्रपट सर्वांनी पाहायला हवा. त्यामुळे चित्रपटाला अनाठायी विरोध करण्यापेक्षा त्यावेळचा इतिहास समजून घ्यायला हवा,’ असे मत महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (दि.11) व्यक्त केले.

राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र विभागाच्या वतीने महात्मा फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे झालेल्या कार्यक्रमात ‘समग्र महात्मा जोतिबा फुले’ आणि ‘समग्र सावित्रीबाई फुले’ या ग्रंथांचे प्रकाशन छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी भुजबळ बोलत होते. याप्रसंगी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि आमदार हेमंत रासने या वेळी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांना केवळ ब्राह्मणच नाही, तर आमच्यातल्या काही अंधश्रद्ध लोकांनीदेखील फुले यांना विरोध केला. अनेक ब्राह्मणांनी फुलेंना मदत केली. आज समाजामध्ये मोठा बदल होत आहे. आज महिला सर्व क्षेत्रांत यश संपादन करत असून, फुलेवाड्यातून याची सुरुवात झाली.

महात्मा फुले यांनी लेखनातून सत्य मांडले : चंद्रकांत पाटील

महात्मा फुले यांनी त्यांच्या लेखनातून सत्य मांडले आहे. त्यांनी जो प्रगत विचार मांडला होता तो सर्वांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे, असे मत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले. चंद्रकांत पाटील म्हणाले, 17 तारखेला आयुक्तांबरोबर बैठक घेऊन फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक एकत्र येण्यासाठी प्रयत्न करू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news