नागपुरात प्रथमच ‘सरोगेट मदर’ प्रकरणाला मंजुरी | पुढारी

नागपुरात प्रथमच 'सरोगेट मदर’ प्रकरणाला मंजुरी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सरोगसी कायदा २०२१ अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१) प्रथमच एका सरोगेट मदर प्रकरणाला मंजुरी देण्यात आली.

जिल्ह्यामध्ये कुठेही अनधिकृत सरोगसी होऊ नये, म्हणून शासनाने नवीन कायद्यानुसार जिल्हा वैद्यकीय मंडळ स्थापन केले आहे. ‘सरोगेट मदर’ साठी या मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. मंडळाच्या सदस्यांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ तथा डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर, वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. माधुरी थोरात, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मडावी, डॉ. जयश्री वैद्य आहेत. यावेळी सरोगेट आई कोणाच्याही दबावाला किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता इच्छेनुसार सरोगसी प्रक्रियेला सामोरे जात असल्याची खात्री प्रत्यक्ष मुलाखत घेऊन केली. तसेच सरोगेट आई व सरोगसी इच्छुक कुटुंबीयांच्या शारीरिक व मानसिक वैद्यकीय अहवालाच्या आधारावर मंडळाने सर्वानुमते हा निर्णय घेतला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली.  या बैठकीस मंडळातील सदस्यांसह वैद्यकीय अधिकारी डॉ. रिना लांजेवार, ॲड. आनंद भिसे, सरोगसी इच्छुक कुटुंबीय, सरोगेट आई उपस्थित होते. सरोगसीच्या मदतीने अनेक महिला पालक बनत आहेत. एखादी स्त्री स्वतःच्या किंवा डोनरच्या एग्सद्वारे दुसऱ्याचे मूल तिच्या गर्भात वाढविते तिला सरोगेट मदर म्हणतात. हल्ली भारतातही या सरोगसीचा ट्रेंड खूप वाढला आहे.

हेही वाचा :

 

Back to top button