तांबडा-पांढरा रश्‍यासह आता मधामुळे कोल्हापुरची देशात ओळख | पुढारी

तांबडा-पांढरा रश्‍यासह आता मधामुळे कोल्हापुरची देशात ओळख

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : तांबडा -पांढरा रस्सा आणि रांगडी कुस्ती या ओळखीसोबतच आता कोल्हापुरच्या मातीचा गोडवा मधाच्या निमित्ताने देशभर पोहोचणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव हे गाव तसेच सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे गाव देशात मधाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. या गावांमधील जवळजवळ शंभर टक्के लोक मधाचा व्यवसाय करतात. त्यामुळे या निमित्ताने एक वेगळी ओळख कोल्हापूरची आणि साताऱ्याची राष्ट्रीय स्तरावर होणार आहे.

राजधानी दिल्लीत नुकताच जागतिक वस्त्रोद्योग महोत्सव पार पडला. त्यात या मधाला दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम अशा उत्तरेतील राज्यांसह ईशान्य भारतातील राज्यातूनही मागणी आली आहे. राष्ट्रीय खादी ग्रामोद्योग मंडळाने मधमाशी पालनासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून मधमाशी पालन उद्योगांचे स्थानिकांना प्रशिक्षण देणे आणि साहित्य वाटप करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी मधाचे गाव निर्मित करण्यात येणार आहे. त्या गावातील लोकांना ८० % शासकीय अनुदान आणि २० % स्वगुंतवणूक या तत्त्वावर उद्योगाचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय देखील काढण्यात आला असल्याचे खादी व ग्रामोद्योग बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

राजधानी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवात खादी ग्रामोद्योग मंडळाच्य़ा अंतर्गत मधमाशी पालन उद्योगाचे दालन होते. राज्याच्या ग्रामीण भागात रोजगाराच्या आणि उद्योजकतेच्या संधी वाढल्या पाहिजेत, यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यरत आहे. या अंतर्गत मधमाशी पालन व्यवसाय करण्यासाठी ठिकठिकाणी मंडळाच्या मार्फत प्रशिक्षण दिले जाते. राज्य शासनाच्या मध केंद्र योजनेअंतर्गत ५० टक्के शासकीय अनुदान आणि ५० टक्के लाभार्थ्याची स्वगुंतवणूक या तत्त्वावर मधमाशी पालन योजना राज्यात राबवली जात आहे. या अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक, महिला, शेतकरी वर्गाला मधमाशी पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचबरोबर यासंबंधी लागणारे साहित्यही देण्यात येत आहे. या उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्याने उत्पादित केलेला मध मध संचलनालय महाबळेश्वर, सातारा मार्फत हमीभावाने खरेदी करण्यात येतो. त्यावर प्रक्रिया करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची विक्री करण्यात येते. मध संचालनालय महाबळेश्वरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मधाला उत्तम भाव मिळतो. काही शेतकऱ्यांनी मध संचालनालय महाबळेश्वरच्या मार्गदर्शनात स्वतःचा मधाचा ब्रँड देखील तयार केला असून ते देशभर व्यवसाय करत आहेत.

दरम्यान, मध संचालनालय महाबळेश्वरद्वारे निर्मित मधाला दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम आदी राज्यातून मागणी आली आहे. मधाच्या शुद्धतेमुळे ही मागणी असल्याचे मध संचलनालय महाबळेश्वरचे संशोधन अधिकारी रघुनाथ नारायणकर यांनी सांगितले. दालनाला भेट दिलेल्या लोकांना मधाची शुद्धता कशी ओळखावी, याबाबतची माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.

यासोबतच मधमाशांचे जतन आणि संगोपन, संवर्धन व्हावे यासाठीदेखील खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यरत आहे. जिथे आग्या मधमाशांच्या वसाहती आहेत तिथे शास्त्रोक्त पद्धतीने मध संकलन कसे करायचे, यासाठी पाच दिवसांचे विशेष प्रशिक्षण खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने देण्यात येते आणि हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत असते. विविध वाड्या वस्तीवरील लोक यात सहभागी होऊ शकतात आणि मधमाशी संकलनाबाबत किंवा मधमाशी पालन व्यवसायाबाबत त्यांच्या शंकांचे निरसन करू शकतात. मध झाडणे, त्याची विक्री त्यातून निर्माण होणारा रोजगार मधमाशीचे जतन यासंबंधीची माहिती या प्रशिक्षणामध्ये दिली जाते.

हेही वाचा :

Back to top button